आमच्याकडे १२ नव्हे १८ खासदार

ब्युरो टीम : 'शिवसेनेचे खासदार लवकरच आम्हाला भेटतील. आमच्याकडे १२ नव्हे तर १८ खासदार आहेत,' अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. लोकसभेत शिवसेनेचे एकूण १८ खासदार आहेत. हे सर्वच्या सर्व खासदार आपल्यासोबत असल्याची तिरकस प्रतिक्रिया शिंदे यांनी दिली आहे. मात्र यातील सहा खासदार अजूनही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत थांबण्याच्या मनस्थितीत असल्याची माहिती आहे. त्यामुळे या सहा खासदारांपैकीही काही खासदार आपल्याकडे खेचण्यासाठी शिंदे यांचे प्रयत्न सुरू आहेत का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
शिवसेनेच्या आमदारांनंतर लोकसभेतील खासदारांकडून बंड करण्याच्या हालचाली सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या दिल्लीत दाखल झाले आहेत. दिल्ली दौऱ्यात एकनाथ शिंदे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेण्याची शक्यता आहे. तसंच आपल्याबरोबर असलेल्या खासदारांचा गट एनडीएसोबत असल्याची माहिती या बैठकीत शिंदे देणार असल्याचे समजते. दिल्लीत पोहोचल्यानंतर शिंदे यांनी शिवसेना खासदारांच्या बंडाबाबत सुरू असलेल्या चर्चेवरही भाष्य केलं आहे.
दरम्यान, राष्ट्रपतिपदाच्या मतदानानंतर शिंदे गटाची सोमवारी ऑनलाइन बैठक पार पडली. या बैठकीला शिवसेनेच्या १८ पैकी १२ खासदारांनी हजेरी लावल्याचे समजते. बैठकीत जवळपास अर्धा तास चर्चा झाली. गटनेते पदासाठी राहुल शेवाळे आणि मुख्य प्रतोदपदासाठी भावना गवळी यांच्या नावाची चर्चा झाल्याचे समजते. शिंदे गट सध्या नवीन गट स्थापन करण्याच्या तयारीत असून त्याबाबत चर्चा करण्यासाठी एकनाथ शिंदे सोमवारी रात्री दिल्लीला रवाना झाले.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने