रशियाच्या आक्रमकतेमुळे युक्रेनची परिस्थिती अधिक बिकट होत आहे. आता याबाबत भारतही सतर्क झाला असुन, युक्रेनमधील भारतीय दूतावासाने सोमवारी आपल्या नागरिकांसाठी ट्रैवेल एडवाइजरी जारी केली असुन, दूतावासाने भारतीय नागरिकांना युक्रेनमध्ये सर्व अनावश्यक प्रवास टाळण्यास सांगितले आहे. तसेच दूतावासाने युक्रेनमध्ये असलेल्या भारतीयांना त्यांची स्थिती दूतावासाला कळवण्यास सांगितले आहे (Embassy in Ukraine has issued a travel advisory for Indian citizens).
भारतीय दूतावासाने युक्रेनमधील वाढता संघर्ष पाहता, भारतीय नागरिकांना युक्रेन आणि तेथील शहरांमध्ये अनावश्यक प्रवास टाळण्याचा सल्ला दिला आहे. तसेच युक्रेनमध्ये राहणाऱ्या भारतीय नागरिकांनी युक्रेन सरकार आणि स्थानिक अधिकाऱ्यांनी जारी केलेल्या सुरक्षा मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन केले आहे. याचबरोबर भारतीय नागरिकांना विनंती करण्यात आली आहे की त्यांनी युक्रेनमधील त्यांची स्थिती दूतावासाला कळवावी जेणेकरून दूतावास त्यांच्यापर्यंत पोहोचू शकेल.
सोमवारी रशियाने युक्रेनच्या अनेक शहरांना लक्ष्य करत अनेक क्षेपणास्त्रे डागली. या हल्ल्यांमध्ये काही नागरिकांचा मृत्यू झाला तर मोठ्या प्रमाणात लोक जखमी झाले आहेत. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी त्यांच्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, क्रिमियन द्वीपकल्पाला जोडणाऱ्या पुलावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून ही कारवाई करण्यात आली. युक्रेनने जर रशियावर असे हल्ले केले तर रशिया त्याला कठोर प्रत्युत्तर देईल असा इशारा देखील त्यांनी दिला.
तत्पूर्वी, भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेल्या अधिकृत निवेदनात सद्यस्थितीबद्दल चिंता व्यक्त करण्यात आली असून. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची म्हणाले की, युक्रेनमधील वाढत्या संघर्षाबद्दल भारताला खूप चिंता आहे. संघर्ष कोणासाठीही चांगला नाही. भारताने दोन्ही बाजूंना शत्रुत्व संपवून चर्चेच्या मार्गाने उत्तर शोधण्याचे आवाहन केले आहे.
टिप्पणी पोस्ट करा