ट्विटरने भारतात आपल्या कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्यास सुरुवात केली

 


जागतिक नोकऱ्या कपातीचा एक भाग म्हणून ट्विटरने भारतातही आपल्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्यास सुरुवात केली आहे. ट्विटरने याआधी जगभरातील आपल्या कर्मचार्‍यांच्या कामावरून कमी करण्याची घोषणा केली होती. जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपती एलोन मस्क यांनी गेल्या आठवड्यात ट्विटरचे सीईओ पराग अग्रवाल तसेच सीएफओ आणि इतर काही उच्च अधिकाऱ्यांना काढून टाकले.

सीईओ आणि सीएफओ यांना काढून टाकल्यानंतर एकामागून एक टॉप मॅनेजमेंटने राजीनामे दिले. ट्विटरने शुक्रवारी कंपनीची जागतिक कर्मचारी संख्या कमी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात कपातीची घोषणा केली. ट्विटर इंडियाच्या एका कर्मचाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर पीटीआयला सांगितले की, "कपात सुरू झाली आहे." काही सहकाऱ्यांना ईमेलद्वारे याबाबत माहिती मिळाली आहे.

पीटीआयच्या म्हणण्यानुसार,ट्विटरने कर्मचाऱ्यांना दिलेल्या एका अंतर्गत ईमेलमध्ये म्हटले होते की, ट्विटरला चांगल्या मार्गावर नेण्याच्या प्रयत्नात आम्ही आमचे जागतिक कर्मचारी वर्ग कमी करण्याच्या प्रक्रियेतून जाऊ. यासंदर्भात सर्व कर्मचाऱ्यांना वैयक्तिक ईमेल पाठवण्यात येईल, असे कंपनीने म्हटले होते.

कर्मचार्‍यांच्या कपातीवर ट्विटर इंडियाने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, इंजिनीअरिंग आणि मार्केटिंगसह अनेक विभागांमध्ये ही कपात झाली आहे. कपाती बाबत मस्कचा कठोर दृष्टिकोन कर्मचाऱ्यांना पाठवलेल्या मेलमध्ये दिसून येतो. ट्विटरने कर्मचाऱ्यांना पाठवलेल्या ईमेलमध्ये म्हटले आहे की कंपनी ट्विटर सिस्टम आणि ग्राहकांच्या डेटासाठी तयार केलेली सर्व कार्यालये तात्पुरती बंद करेल. 'तुम्ही ऑफिसमध्ये असाल किंवा ऑफिसला जात असाल तर कृपया घरी परत जा' असं यात ट्विटरने म्हटलं होतं.

ट्विटरच्या अंदाजे 7,500 कर्मचार्‍यांपैकी जवळजवळ अर्ध्ये कर्मचारी कमी करू शकतो. एप्रिलमध्ये ट्विटर विकत घेण्याची ऑफर दिल्यानंतर मस्कने काही दिवसांनी यातून माघार घेतली. पण नंतर कायदेशीर त्रास टाळण्यासाठी त्याने हा करार पूर्ण केला.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने