Maharashtra Kesari Kusti : महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेवरून 'या' जिल्ह्यात सुरू झाली राजकीय कुस्ती!



ब्युरो टीम : नगर शहरात महाराष्ट्र केसरी स्पर्धेचे आयोजन होणे ही कुस्ती प्रेमींसाठी आनंदाची बाब आहे. मात्र नगरच्या आमदारांनी नगरला स्पर्धा होणार असल्याची खोटी माहिती देत कुस्ती प्रेमींची फसवणूक केली. हे खेदजनक आहे. मुळात सुरुवातीपासूनच स्पर्धा पुणे येथेच ठरल्या होत्या. १० ते १४ जानेवारीला स्पर्धा पुण्यात पार पडणार आहेत. मात्र क्रिकेट असोसिएशन प्रमाणे जिल्हा तालीम संघावरही ताबा मारण्याचा "त्यांचा" डाव सुरु आहे, असा गंभीर आरोप क्रीडापटू प्रवीण गीते यांनी केला आहे. यामुळे महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा आयोजनावरून काँग्रेस - राष्ट्रवादीमध्ये नगरमध्ये राजकारण पेटले आहे. 

गीते यांनी अनेक गंभीर आरोप करणारे प्रसिद्धीपत्रक जारी केले आहे. गीते म्हणाले की, 'कुस्ती अथवा अन्य कोणताही खेळ असो, खेळामध्ये पुढाऱ्यांनी राजकारण करू नये. तालीम संघ हा स्थापनेपासून राज्य परिषद, भारतीय महासंघाशी अधिकृतरित्या संलग्न असून मान्यता प्राप्त आहे. शहरात,जिल्ह्यात स्पर्धांच्या अधिकृत आयोजनासाठी तालीम संघाच्या माध्यमातूनच प्रस्ताव पाठवावा लागतो. 

मात्र काहींनी जाणीवपूर्वक नाव साधर्म्य असणाऱ्या अहमदनगर जिल्हा कुस्तीगीर परिषदेची बेकायदेशररित्या स्थापना करून घाणेरडे राजकारण सुरू केले आहे. जिल्हा संघाचे अध्यक्ष पै.वैभव लांडगे यांना कै. पै. छबुराव लांडगे यांच्यापासून अनेक दशकांची परंपरा आहे. "दख्खनचा काला चित्ता" म्हणून त्यांची देशभर ख्याती आहे. कुस्ती टिकवून ठेवणे, त्याला मोठे करण्याचे काम जिल्हा तालीम संघ, लांडगे परिवाराने केले आहे. 

गीते म्हणाले की, मे महिन्यात जिल्हा संघाच्या सहकार्याने तसेच संघ व राज्य परिषदेच्या मान्यतेने किरण काळे युथ फाउंडेशनने शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या संकल्पना व पुढाकारातून, अध्यक्ष पै. वैभव लांडगे यांच्या अनुभवी नियोजनातून "भव्य छत्रपती शिवराय राज्यस्तरीय निमंत्रित केसरी कुस्ती स्पर्धेचे" तत्कालीन मंत्री आ. बाळासाहेब थोरात, क्रीडा मंत्री आ. सुनील केदार, राज्य परिषदेचे पदाधिकारी, राज्य, जिल्ह्यातील नवे-जुने पैलवान यांच्या उपस्थितीत वाडीयापार्कच्या विस्तीर्ण मैदानावर  यशस्वीरित्या आयोजन करण्यात आले होते. साडे सोळा लाखांची रोख बक्षीसं दिली होती. हजारो कुस्ती प्रेमींनी आनंद लुटला. त्यामुळे केवळ काळेंवर राजकीय कुरघोडी करण्यासाठी काहींनी कुस्तीत राजकारण आणले आहे. नोव्हेंबरलाच पुण्यात स्पर्धा होण्याचा अंतिम निर्णय झाला असताना देखील दि. ९ डिसेंबरला आमदारांनी परिषदेचे माजी अध्यक्ष खा. शरद पवारांनी त्यांना नगरमध्ये स्पर्धा आयोजनासाठीचे पत्र दिल्याची दिशाभूल करणारी माहिती प्रसारमाध्यमांना दिली. कारण पुण्याची घोषणा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. ब्रीजभूषण सिंह यांनी स्वतः दिल्लीतून केलेली असल्यामुळे नगरला स्पर्धा होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. केवळ पाहणी झाली म्हणजे स्पर्धा इथे होणारच असे होत नाही, असे गीते यांनी म्हटले आहे. 

आमदारांनी २५ ते ३० नोव्हेंबर या खोट्या तारखा जाहीर केल्या होत्या. आज २७ नोव्हेंबर आहे. मात्र अशा कोणत्याही स्पर्धांना नगरमध्ये सुरुवात झालेली नाही. ही वस्तुस्थिती आहे. याचे स्पष्टीकरण देण्यासाठी पुढे येण्याची साधी तसदी देखील त्यांनी घेतलेली नाही. कुस्ती शौकिनांना दुखावण्याचे काम त्यांनी केले आहे. याचा आम्ही क्रीडाप्रेमी, क्रीडापटूंच्या वतीने तीव्र निषेध करतो. भविष्यात महाराष्ट्र केसरी नगरला आयोजित करण्यासाठी निश्चितपणे प्रयत्न केले जातील, असे गीते यांनी म्हटले आहे. 



0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने