ब्युरो टीम : राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मु यांचे दुपारी ४ वाजता दाबोळी विमानतळावर आगमन झाले. राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई, मुख्यमंत्री प्रमोद सावंत व शिष्टाचारमंत्री मॉविन गुदिन्हो यांनी त्यांचे स्वागत केले.
राष्ट्रपती तीन दिवस गोव्यात राहणार आहेत. काही वेळातच पणजीतील आझाद मैदानावर हुतात्मा स्मारकाला भेट देऊन त्या आदरांजली वाहतील. त्यानंतर सायंकाळी ६.३० वाजता राजभवनवर दरबार हॉलमध्ये राष्ट्रपतींचे नागरी स्वागत केले जाईल.
उद्या बुधवारी २३ रोजी सकाळी १० वाजता गोवा विद्यापीठाच्या पदवीदान सोहळ्यास महामहीम राष्ट्रपती उपस्थिती लावणार आहेत. त्यानंतर दुपारी ४ वाजता पर्वरी येथे विधानसभा संकुलात विधानसभेच्या विशेष अधिवेशनात श्रीमती मुर्मू संबोधणार आहेत.
देशाच्या पंधराव्या राष्ट्रपती म्हणून सुत्रे हाती घेतल्यानंतर श्रीमती मूर्मु यांची ही पहिलीच गोवा भेट आहे. गुरुवारी २४ रोजी महामहीम राष्ट्रपती जुने गावे येथील जगप्रसिद्ध चर्चला तसेच कवळे येथील शांतादुर्गा मंदिराला भेट देतील व दुपारी दिल्लीला प्रयाण करतील.
टिप्पणी पोस्ट करा