शिंदे गटाच्या शिवसेनेत मोठा भूकंप ; तब्बल 400 पदाधिकारी राजीनाम्याच्या तयारीत
ब्युरो टीम: शिवसेनेत फूट पडून आता जवळपास वर्ष झाले असून, या कालावधीत उद्धव ठाकरे यांच्या गटातील अनेक नगरसेवक व पदाधिकारी शिंदे गटाच्या शिवसेनेत येत आहेत. मात्र वर्षभरापासून शिंदेसेनेत जोरदार 'इनकमिंग' सुरू असताना पहिल्यांदाच शिवसेनेला 'जय महाराष्ट्र' करणाऱ्या पदाधिकाऱ्यांची मोठी यादी समोर आली आहे. मुंबईतील जोगेश्वरीमधला शिवसेना शिंदे गटातील संघर्ष उफाळून आला आहे.
नेमकं काय काय?
स्वत:ला कडवे शिवसैनिक म्हणवून घेणारे रामदास कदम यांचे सुपुत्र सिद्धेश कदम यांच्यामुळे पदाधिकाऱ्यांनी राजीनास्त्र उपसल्याची घटना ताजी असतानाच जोगेश्वरीतील शिंदे गटात असंतोष उफाळून आला आहे. शिंदे गटाचे जोगेश्वरी पूर्ण येथील विभाग क्रमांक चारचे प्रमुख विजय धिवार आणि महिला विभागप्रमुख शिल्पा वेले यांच्या छळामुळे आम्हाला आत्महत्या करावी वाटतीये, अशा उद्विग्न भावना शाखा संघटकांनी बोलून दाखवल्या आहेत.
शाखाप्रमुख असलेले प्रकाश शिंदे म्हणाले, विभागप्रमुख विजय धिवार यांची मनमानी आम्ही सहन केली. आमच्या तक्रारी आम्ही वरिष्ठ नेते संजय मोरे, सिद्धेश कदम आणि नरेश म्हस्के यांच्या कानावर घातल्या. पण तरीही विजय धिवार यांची मनमानी सुरूच आहे. त्यामुळे शाखा क्रमांक ७७ मधील जवळपास २०० पदाधिकारी तर जोगेश्वरीतील जवळपास ४०० पदाधिकारी राजीनाम्याच्या तयारीत आहेत.
विभागप्रमुख विजय धिवार यांना पक्षाची कोणतीही चिंता नाही. ते महिलांचा मानसिक छळ करतात. आम्हाला दडपण आलंय. जीव द्यावासा वाटतोय. विभागप्रमुख महिलांशी बोलताना इतक्या घाणेरड्या शब्दांत बोलतायेत की आम्ही शब्दात सांगू शकत नाही. त्यांच्या कामाला कंटाळून आम्ही प्रभागातील महिला राजीनामा देणार आहोत, अशा संतापजनक भावना जोगेश्वरी विधानसभेच्या संघटक सुरेखा सुर्वे यांनी व्यक्त केल्या.
टिप्पणी पोस्ट करा