Jayanti : आज महापुरुषांची जयंती झाली पुढे काय ? विचार कार्याला लावणारा प्रश्न

 


ब्युरो टीम : आज मला एक प्रसंग आठवला - एका गावात अंधश्रध्दा निर्मुलन समितीच्या कार्यक्रमात अनिस कार्यकत्यांनी विविध हातचलाखीचे प्रयोग करुन दाखवले व ढोंगी साधु महाराज लोकांना हातचलाखी करून करणी, भानामती, दैवी चमत्कार या नावाखाली कसे फसवतात हे सांगीतले.लोक टाळ्या वाजवत होते. कार्यक्रम शेवटी समारोप वेळी त्यांनी लोकांना आव्हान केले कि आता आम्ही तुमच्या सर्वांच्या हातात मंत्राने सोन्याची चैन देणार आहोत. सर्वांनी डोळे झाकून हात पुढे करा व पाच मिनिटे आमच्या बरोबर मंत्र म्हणा. लोकांनी डोळे झाकून हात पुढे करत मंत्र म्हटले. पाच मिनिटे होवूनही सोने चैन हातात येत नव्हती शेवटी वैतागून सर्वांनीच एकदम डोळे उघडले तर व्यासपीठावर अंनिसचे कोणीच उपस्थित नव्हते. त्यावेळी व्यासपीठावर येवून एक व्यक्ती म्हणाला एवढा वेळ अंधश्रध्दा निर्मूलन समितीने आम्हाला चमत्कार कसे खोटे असतात हे कृतीने दाखवले पण तुम्हीं अजूनही चमत्कारावर विश्वास ठेवून डोळे झाकून बसलात.आमच्या समाजाचे हि असेच झालेय.आमच्या राष्ट्रपुरुष/राष्ट्रमाता यांचे विचार, तत्वांकडे आम्हीं डोळेझाक करत असतो. काल (३जाने.)सर्वत्र क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्सवात साजरी करण्यात आली. मोठमोठी भाषणे करण्यात आली. जयंतीला शाळेत मुली सावित्रीचा वेशभूषा करतांना दिसतात. प्रश्न असा पडतो की जयंती साजरी केली पण पुढें काय? जयंती नंतर आमचे रोजचे जीवन आमच्याच तत्वाने चालू असते. सावित्रीने जाती, धर्म, पंथ भेद पाळला नाही याउलट आम्हीं जातीधर्मावरून आमच्याच भावंडांशी भांडू लागलो. आम्हीं समाजसुधारक, राष्ट्रपुरुष,राष्ट्रमाता यांना जाती धर्मात व पुतल्यात बंदिस्त करून ठेवले. सावित्रीबाईंनी अंधश्रद्धा विरोधात लढा दिला आम्हीं आजही भोंदूबाबा वर विश्वास ठेवून फसतो. सावित्रीने दुष्काळात लोकांना स्वतःच्या घरचा हौद खुला करून पाणी दिले आज शेतकरी दुष्काळात होरपळत असताना कोणत्याही सत्ताधारी सरकारला काहीच वाटतं नाही. एकीकडे आम्हीं सावित्रीचा जयघोष करतो व दुसरीकडे वंशाचा दिवा पाहिजे म्हणून भविष्यातील सवित्री गर्भातच मारतो.आमच्या दैवतावर आजही कुणीही टिका करून सामजिक सलोखा नष्ट करू पाहतात. खरा मुद्दा हा आहे कि सर्वच राष्ट्रपुरुष /राष्ट्र‌माता समाजसुधारकाचे कार्य खरच खूपच महान आहे. मग त्यांची आठवण फक्तं जयंती/ पुण्यतिथीलाच का काढली जाते? खरं तर रोजच्या जगण्यात राष्ट्रपुरुष/ राष्ट्रमाता यांचे विचार आचरणात आणणे आवश्यक आहे. फक्तं पुतळे डोक्यावर घेऊन उपयोग नाही तर त्यांचे विचार डोक्यात घेतले तरच जयंती साजरी केल्याचे सार्थक होईल.

 - लेखक - प्रा. महेंद्र मिसाळ ( लेखक हे क्रांतीज्योती पुस्तकाचे लेखक आहेत)

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने