ब्युरो टीम :शिर्डीच्या साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नगरचे भूमिपुत्र गोरक्ष गाडीलकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गाडीलकर सध्या नागपूरला रेशीम संचालक म्हणून कार्यरत होते. ते मूळचे पळवे (ता. पारनेर) येथील रहिवाशी आहेत. अलीकडेच आयएएस दर्जा मिळालेले गाडीलकर यांच्या रुपाने या पदावर नगर जिल्ह्याच्या भूमिपुत्राला संधी मिळाली आहे.
यापूर्वीचे ‘सीईओ’ पी. शिवाशंकर यांच्यासंबंधी ग्रामस्थांच्या तक्रारी आल्याने डिसेंबर २०२३ मध्ये त्यांची बदली करण्यात आली होती. तेव्हापासून हे पद रिक्त होते. आता त्यांच्या जागी गाडीलकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आज सायंकाळी त्यांच्या नियुक्ती आदेश प्राप्त झाला.
गाडीलकर यांनी पूर्वी नगरमध्ये उपजिल्हाधिकारी म्हणून काम केले. बारा वर्षांपूर्वी जिल्ह्यात पडलेल्या दुष्काळाच्या वेळी गाडीलकर टंचाई शाखेचे उपजिल्हाधिकारी होते. त्यांच्याच नेतृत्वाखाली टंचाई निवारणाची यंत्रणा राबविण्यात आली. करोना काळात ते नाशिकला महसूल उपायुक्त होते, त्या काळातही त्यांनी नगरला येऊन करोना साथ निवारणासंबंधी काम केले आहे. अपर जिल्हाधिकारीनंतर अलीकडेच ते ‘आयएसएस’ झाले. आता त्यांच्याकडे शिर्डीच्या ‘सीईओ’ पदाची सूत्रे सोपविण्यात आली आहेत.
शिर्डीतील मुख्य कार्यकारी अधिकारी या पदावर आयएएस अधिकारी नियुक्त करावा, असे उच्च न्यायालयाचे निर्देश आहेत. तेव्हापासून या पदावर आयएएस अधिकाऱ्यांची नियुक्ती होत आहे. मोजके अपवाद सोडले तर या पदावर आलेल्या बहुतांश अधिकाऱ्यांना कार्यकाळ पूर्ण न करताच परत जावे लागले आहे. यामागे स्थानिक नागरिक अगर लोकप्रतिनिधींशी झालेले मतभेद आणि कोर्टबाजी ही कारणे असल्याचे आढळून येते. यापार्श्वभूमीवर नगरचे भूमिपुत्र असलेले गाडीलकर येथे आपल्या कामाची कशी छाप पाडतात? त्यांना पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह अन्य लोकप्रतिनिधी आणि स्थानिक ग्रामस्थांची कशी साथ मिळते, याकडे लक्ष लागले आहे.
.jpeg)
टिप्पणी पोस्ट करा