ब्युरो टीम : मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत मतदारांनी २० ऑगस्टपर्यंत आपले अर्ज मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याकडे सादर करावेत किंवा ऑनलाईन भरावे, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.सुहास दिवसे यांनी केले आहे.
भारत निवडणूक आयोगाने १ जुलै २०२४ रोजीच्या अर्हता दिनांकाच्या आधारे मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमाचे सुधारित वेळापत्रक निश्चित केले आहे. त्याअंतर्गत प्रारूप मतदार यादी ६ ऑगस्ट २०२४ रोजी प्रसिद्ध होणार आहे. २० ऑगस्टपर्यंत मतदार नोंदणी, नाव, पत्ता आदी तपशीलात बदल करण्यासाठी दावे व हरकती दाखल करता येणार आहेत.
मतदार नोंदणीसाठी अर्ज नमुना क्रमांक ६, नाव समाविष्ट करण्यास हरकत, यादीत यापूर्वीच समाविष्ट असलेले नाव वगळणे, स्थलांतर झाल्यामुळे नाव वगळणे आदींसाठी नमुना क्र. ७, पत्ता बदल, तपशीलात दुरुस्ती, दुबार इपीक कार्ड मिळणे आदींसाठी नमुना क्र. ८ हे अर्ज ऑनलाईनरित्या भरण्यात येत आहेत. याबाबत संबंधितांना एसएमएस पाठविण्यात येत आहेत. एसएमएस प्राप्त झाल्यावर त्वरित संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांची भेट घेऊन आवश्यक माहिती आणि कागदपत्रे द्यावी.
मतदार नोंदणी मोहिमेत नागरिकांनी सहभाग घेऊन निवडणूक प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही डॉ.दिवसे यांनी केले आहे.
टिप्पणी पोस्ट करा