ब्युरो टीम : भारत निवडणूक आयोगाने सार्वत्रिक विधानसभा निवडणूकीचा कार्यक्रम घोषित केला असल्याने अहिल्यानगर जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६३ अन्वये निवडणूक कालावधीत मतदान केंद्रांच्या २०० मीटर परिसरात मोबाईलचा वापर करण्यास बंदीचे आदेश निर्गमित केले आहेत.
जिल्ह्यात मतदान होणार असल्याच्या ठिकाणापासून २०० मीटर परिसरात मंडपे, दुकाने उभारण्यास बंदी राहील. तसेच मोबाईल फोन, स्मार्ट फोन, कॉर्डलेस फोन, पेजर, वायरलेस सेट, ध्वनीक्षेपके व इतर इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे बाळगण्यासही प्रतिबंध करण्यात आला आहे. निवडणूक निरिक्षक, जिल्हा निवडणूक अधिकारी, निवडणूक कामकाजाकरिता नेमणूकीस असलेले मतदान केंद्र अधिकारी, सूक्ष्म निवडणूक निरीक्षक, निवडणूक निर्णय अधिकारी, सहा. निवडणूक निर्णय अधिकारी, अतिरिक्त सहा. निवडणूक निर्णय अधिकारी, पोलीस अधिकारी व मतदार यांचे व्यतिरिक्त इतर व्यक्तीस प्रवेशाकरीता प्रतिबंध करण्यात आला आहे. या परिसरात खाजगी वाहन आणण्यास किंवा संबंधीत पक्षाचे चिन्हाचे प्रदर्शन करण्यासही मनाई करण्यात आली आहे. हा आदेश २० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदान सुरू झाल्यापासून मतदान संपेपर्यंत अंमलात राहील, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
टिप्पणी पोस्ट करा