BJP Maharashtra : हा तर महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानाचा अवमान, भाजपचा काँग्रेसवर हल्लाबोल



ब्युरो टीम :  लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी  यांच्या प्रमुख उपस्थितीत आज, बुधवारी (6 नोव्हेंबरला) नागपुरातील भट सभागृहात संविधान सन्मान संमेलन आयोजित करण्यात आले होते. मात्र, या संमेलनात राहुल गांधी यांनी ज्या लाल पुस्तकाला संविधान म्हणून संबोधले होते, त्या लाल पुस्तकात फक्त कोरी पाने होती, असा दावा भाजपकडून करण्यात आला होता. तसा व्हिडिओही भाजपकडून ट्विट करण्यात आला होता. त्यावर महाराष्ट्रातील काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी संविधान सन्मान संमेलनात आलेल्या मान्यवरांना नोटपॅड, पेन दिले जाते. याच नोटपॅडचे व्हिडिओ बनवून थिल्लर आरोप भाजपने केल्याचा दावा केला होता. 

मात्र आता यावरून पुन्हा एकदा भाजपने काँग्रेसवर हल्ला केलाय. भाजपने ट्विट करून,  ‘खरं तर संविधानाचं कव्हर लावून नोटपॅड सारखा वापर करणं हा देखील महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानाचा अवमान आहे,’ अशी जोरदार टीका काँग्रेसवर केली आहे. 

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाचा अपमान करणाऱ्या राहुल गांधींचा भाजपकडून निषेध करताना त्यांनी त्यांच्या एक्स अकाऊंटवरून राहुल गांधी यांना लक्ष्य केलं होतं. त्यामध्ये त्यांनी म्हंटले होते की, ‘संविधान सिर्फ बहाना है, लाल पुस्तक को बढ़ाना है.. मोहब्बत के नाम पर 

सिर्फ नफरत फैलाना है... आरक्षण विरोधी  काँग्रेसची ही संविधान संपवण्याची पहिली पायरी तर नाही ना? काँग्रेसला भारताचे संविधान असेच कोरे करायचे आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेले सर्व कायदे अनुच्छेद वगळून टाकायचे आहेत. म्हणूनच तर राहुल गांधींनी मध्यंतरी आरक्षण रद्द करणार ही भविष्यवाणी केली होती. राहुल गांधी यांनी लक्षात ठेवा, श्रध्देय डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचं संविधान हा निवडणुकीचा मुद्दा नाही तर भारताचा आणि भारतीयांच्या जगण्याचा पाया आहे. त्यामुळे संविधान विरोधी काँग्रेसला  जनताच धडा शिकवेल. संविधानाच्या मारतात बाता.. काँग्रेसचा एकूण विषयच खोटा.. संविधान विरोधी काँग्रेस,’ असे या ट्विटमध्ये भाजपने म्हटले आहे. 

 

 भाजपच्या या ट्विटला उत्तर देताना विजय वडेट्टीवर यांनी म्हंटले होते की,’ राहुलजी गांधींच्या नागपूरातील आजच्या दौऱ्याचा भाजपने इतका धसका का घेतला? संविधान सन्मान संमेलनात आलेल्या मान्यवरांना नोटपॅड, पेन दिले जाते. याच नोटपॅडचे व्हिडिओ बनवून थिल्लर आरोप करणे ह्यात दूरपर्यंत बुद्धीचा वापर दिसत नाही! राहुलजी गांधी नागपुरात आले तर भाजप वाले इतके घाबरले? फेक नरेटिव्ह वाल्यानो डरो मत... संविधान आणि राहुल गांधी तुम्हाला वेळोवेळी खोटे पाडणार आहेत! ही फक्त सुरुवात आहे...’

मात्र आता विजय वडेट्टीवर यांच्या ट्विटला भाजपनं पुन्हा उत्तर देऊन काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे. त्यामुळे हा वाद आणखी पेटण्याची चिन्हे आहेत. 


भाजपच्या एक्स अकाऊंटवरून नेमकं काय म्हंटले आहे?

भाजपन त्यांच्या एक्स अकाऊंटवरून काँग्रेसवर टीका करताना म्हंटले आहे की,’तुम्ही सत्य स्वीकारल्याबद्दल खूप खूप आभार. राहुल गांधींच्या कोऱ्या संविधानाचं बिंग फुटल्यानंतर विजय वडेट्टीवार सावरायला आले आहेत. खरं तर संविधानाचं कव्हर लावून नोटपॅड सारखा वापर करणं हा देखील महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानाचा अवमान आहे. काँग्रेसनं या आधी अनेकवेळा संविधान पायदळी तुडवलं आहे आणि आता संविधानाचं कव्हर नोटपॅडसाठी वापरलं जातंय. संविधानाचा नोटपॅड म्हणून वापर करताना तुम्ही बुध्दी गहाण ठेवली होती का? फक्त कव्हर दाखवायचं आणि लोकांना भुलवायचं हे तुमचं फेक नरेटीव्ह आहे. याला येत्या २० तारखेला महाराष्ट्रातील जनता मतांमधून थेट प्रत्युत्तर देईल.’


0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने