ब्युरो टीम : भारतामध्ये काही आजारांच्या उपचाराचा खर्च खूपच जास्त आहे. या खर्चाचा एखाद्या व्यक्तीच्या आर्थिक परिस्थितीवर देखील मोठा परिणाम होऊ शकतो. अशावेळी तुम्ही जर आरोग्य विमा घेतला असेल, तर तुम्हाला उपचाराच्या खर्चाची चिंता नसते. आज आम्ही तुम्हाला अशाच भारतातील टॉप पाच आजारांबद्दल माहिती देणार आहोत, ज्यांचा उपचाराचा खर्च जास्त असून तुम्हाला या उपचाराच्या खर्चापासून दिलासा देण्यासाठी आरोग्य विमा आवश्यक आहे.
चला तर हे आजार कोणते आहेत, ते जाणून घेऊ
स्ट्रोक
मेंदूतील कोणतीही धमनी ब्लॉक झाल्यास स्ट्रोक हा आजार उद्भवतो. हातपाय किंवा चेहरा सुन्न होणे, डोकेदुखी, डोळ्यांनी दिसण्यास अडचण येणे, चालण्यात अडचण, बोलण्यात अडचण ही स्ट्रोकची लक्षणे आहेत. उच्च रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉल असलेल्या लोकांमध्ये स्ट्रोक होण्याचं प्रमाण जास्त असते. याशिवाय, मधुमेह असलेली व्यक्ती, धूम्रपानाची जास्त सवय, ब्रेन हॅमरेजची समस्या असलेल्या व्यक्ती, हृदयरोग असणऱ्या व्यक्ती यांना स्ट्रोकचा धोका जास्त असतो. स्ट्रोक होण्यापासून स्वत:ला वाचवण्यासाठी धूम्रपान सोडा. रक्तदाब नियंत्रणात ठेवा. निरोगी जीवनशैलीचे अनुसरण करा. नियमित व्यायाम करा. दारुचं सेवन बंद करा. उच्च फायबर आणि कमी चरबीयुक्त अन्नाचा आहारात समावेश करा.
श्वसन रोग
श्वासोच्छवासाच्या संसर्गामुळे दरवर्षी देशात मोठ्या प्रमाणात मृत्यू होतात. भारतातील सर्वात धोकादायक आजारांपैकी हा एक आजार आहे. यामध्ये फुफ्फुसाचे आजार, न्यूमोनिया अशा काही आजाराचा समावेश आहे. ताप, खोकला, सर्दी, शिंका येणे, नाक वाहणे, घसा खवखवणे अशी या आजाराची लक्षणे आहेत. विषारी पदार्थांच्या, हवेच्या संपर्कात येणे, कमी रोगप्रतिकारशक्ती, धूम्रपान, धूळ आणि वायू प्रदूषणाच्या संपर्कात येणे अशी या आजाराची कारणे आहेत. श्वसनासंबंधी आजार टाळण्यासाठी धूम्रपान सोडा, नियमित व्यायाम करा, मास्क वापरा, प्रदूषित हवेत जाणे टाळा, प्रथिनेयुक्त आहार घ्या.
क्षयरोग
क्षयरोग फुफ्फुसांना तसेच शरीराच्या इतर अवयवांना संक्रमित करतो. हा जीवघेणा आजार आहे. मात्र, योग्य उपचारांनी हा आजार बरा होऊ शकतो. थकवा, खोकताना रक्त पडणे, ताप आणि सर्दी, रात्री घाम येणे, भूक न लागणे किंवा भूक कमी लागणे, वजन कमी होणे, ही क्षयरोगाची लक्षणे आहेत. कमकुवत रोगप्रतिकारशक्ती, अशा रोगास कारणीभूत असलेल्या भागात राहणे, संक्रमित लोकांचा संपर्कात येणे, अशी क्षयरोग होण्याची कारणे आहेत. तर, क्षयरोगापासून वाचण्यासाठी प्रतिबंधात्मक उपायांचे पालन करणे खूप महत्त्वाचे आहे. यामध्ये संक्रमित लोकांच्या संपर्कापासून दूर राहणे, लसीकरण करणे, निरोगी अन्न खाणे आदींचा समावेश होतो.
मधुमेह
मधुमेह (डायबेटिस) हा एक जीवघेणा आजार आहे. या आजाराचे दोन प्रकार असतात ते म्हणजे टाइप 1 मधुमेह आणि टाइप 2 मधुमेह. भूक जास्त लागणे, विनाकारण वजन कमी होणे, थकवा येणे, वारंवार लघवी होणे अशी मधुमेहाची लक्षणे आहेत. तर, चुकीच्या खाण्याच्या सवयी, नियमित व्यायाम न करणे, उच्च रक्तदाब, लठ्ठपणा इ. मधुमेह होण्याची कारणे आहेत. मधुमेह झाल्यानंतर उपचार करण्यापेक्षा हा आजार होऊ नये, यासाठी काळजी घेणं महत्त्वाचं आहे. जर तुम्ही नियमित व्यायाम, योग्य जीवनशैली, पौष्टिक अन्नाचे सेवन, धुम्रपान टाळणे, फायबर युक्त आहाराचे सेवन केल्यास तुम्हाला मधुमेह होण्याची शक्यता कमी राहील.
अल्झायमर
अल्झायमर हा आजार स्मरणशक्ती कमी होण्याशी संबंधित आहे. या आजारामुळे एखाद्या गोष्टीचा तर्क लावणे, विचार करण्याची क्षमता कमी होते. काम करताना अडचण येणे, गोष्टी विसरणे, चुकीचे लिखाण, बोलण्यात, लिहिण्यात समस्या, वारंवार चुकीचे निर्णय घेणे, हे अल्झायमर आजाराची लक्षणे आहेत. हा आजार अनुवांशिक असू शकतो. याशिवाय, वृध्दापकाळ, अस्वस्थ जीवनशैली, डोक्याला झालेला कोणताही आघात अशा कारणांमुळेही हा आजार होतो. या आजाराला प्रतिबंध करण्यासाठी तुम्ही निरोगी आहार घेणे, चरबीयुक्त पदार्थ टाळणे, धूम्रपान सोडणे असे उपाय करू शकतात.
टिप्पणी पोस्ट करा