IFFIWood :'लेफ्ट अनसेड' या मोठ्या आशयाच्या छोट्याशा पोर्तुगीज चित्रपटाचा 55 व्या इफ्फीमध्ये वर्ल्ड प्रीमियर



ब्युरो टीम : चित्रपट निर्माता रिकार्डो व्हॅलेंजुएला पिनीला याच्या 'लेफ्ट अनसेड (Lo Que No Se Dijo)' या पोर्तुगीज चित्रपटाचा वर्ल्ड प्रीमियर अर्थात जगातील पहिला खेळ 55 व्या इफ्फीमध्ये प्रदर्शित करण्यात आला. जागतिक सिनेमांच्या 'सिनेमा ऑफ द वर्ल्ड' या विभागात दाखवण्यात आलेला हा चित्रपट, मोबाईल तंत्रज्ञानाचा उदय झाल्यानंतर, व्यक्तीव्यक्तींच्या संवादातील गुंतागुंत उलगडून दाखवतो. इफ्फीमध्ये पत्रकार परिषदेत बोलताना दिग्दर्शक रिकार्डो व्हॅलेंजुएला पिनीला यांनी आपल्या या पहिल्याच कथाकेंद्री (फीचर फिल्म) चित्रपटाबद्दल चर्चा केली.

दक्षिण चिलीमध्ये 1994 मध्ये घडणारा हा चित्रपट, मार्गारिटा या एकल मातेची व्यथित करणारी कथा मांडतो. एकीकडे मार्गारिटा मोबाईल फोन विक्रेती म्हणून करिअर घडवण्यासाठी धडपडत आहे, तर दुसरीकडे तिच्या व्यक्तिगत आयुष्यात नात्यांमधल्या ताणतणावांना सामोरी जात आहे. संपर्काची माध्यमे उपलब्ध करून देणारा आणि रोजच्या जगण्याचा अगदी जवळचा असा तिचा व्यवसाय आणि स्वतःच्या आईशी संवादाचा धागा जोडण्यातील तिची असमर्थता, या भावनिक गाभ्याभोवती चित्रपट गुंफला आहे.

"ही अगदी माझ्या जीवनाची कहाणी आहे", असे दिग्दर्शकाने सांगितले. "यातील प्रमुख व्यक्तिरेखा, 1990 च्या दशकात हेच काम करणाऱ्या माझ्या आईवरून बेतलेली आहे. लोकांना मोबाईल तंत्रज्ञानाची ओळख करून देण्यासाठी ती ग्रामीण भागात फिरत असे. संपर्काची पारंपरिक माध्यमे सोडून देण्याच्या कल्पनेला लोक विरोध करत तेव्हा ती खरोखरच आह्वानात्मक परिस्थिती असे."

'लेफ्ट अनसेड' या चित्रपटामध्ये, 1990 च्या दशकाचे सार अगदी बारीक तपशिलांसह मांडले आहे. त्याविषयी दिग्दर्शक सांगतो, "तो काळ जसाच्या तसा दाखवण्यासाठी आमच्याकडे प्रगत तंत्रज्ञान नव्हते. परंतु कला विभागाने अप्रतिम काम केले. तेव्हाचा आणि आताच्या ग्रामीण चिली मध्ये आजही फारसा फरक नाही, यामुळे, खरे वाटणारे चित्र उभे करण्यात मदत मिळाली."

"आम्ही अगदी कमी कर्मचारी आणि अभिनेते घेऊन काम केले. त्यापैकी बहुतांश अभिनेते स्थानिक आणि बिगर-व्यावसायिक कलाकार होते", असे पिनीला यांनी सांगितले. "ही प्रक्रिया कठीण असली तरी समाधान देणारी होती. खर्चाबद्दल अनेक मर्यादा सहन करून, हा छोटासा चित्रपट मोठा आशय मांडतो."

पिनीला हेच या चित्रपटाचे लेखक आणि संगीत दिग्दर्शक आहेत. 'आधुनिक संपर्काच्या कल्पनेतील विरोधाभास' हा महत्त्वाचा संदेश चित्रपटातून प्रतीत होतो, यावर ते भर देतात- "स्मार्टफोन आणि समाज माध्यमांमुळे आपण एकमेकांशी पूर्वीच्या कोणत्याही काळापेक्षा अधिक जोडलेले आहोत, तथापि आपल्या व्यक्तिव्यक्तींमधील नातेसंबंधांचा ऱ्हास होत आहे. ही केवढी विसंगती आहे!"

देलाविदा फिल्म्स ही कंपनी पिनेला यांनी 2013 मध्ये स्थापन केली असून स्वबळावरील लॅटिन अमेरिकन चित्रपटांची गुणवत्ता उंचावण्याच्या कल्पनेने त्यांना झपाटून टाकले आहे. "माझ्या देशात प्रस्थापित चित्रपट उद्योग नाही परंतु सहयोगाच्या माध्यमातून आम्ही पुढे जात आहोत, जसे की- कोलंबियासमवेत केलेली आमची ही सहनिर्मिती. इफ्फीमध्ये हजेरी लावणे हा महत्त्वाचा टप्पा असून, लॅटिन अमेरिका आणि माझा प्रदेशातील कथांचे प्रतिनिधित्व करत असल्याचा मला अभिमान आहे", असे त्यांनी सांगितले. 

नाती आणि संवादाच्या माध्यमांसमोरील आह्वाने यांचे कालातीत प्रतिबिंब 'लेफ्ट अनसेड' या चित्रपटात पडलेले दिसते. "1994 असो की 2024, अंतरीची घालमेल तीच असते. तंत्रज्ञान उत्क्रांत झालेही असेल, परंतु खरीखुरी नाळ जुळून उमलणाऱ्या संवादाची आणि जिव्हाळ्याच्या मानवी नातेसंबंधांची ओढ कायम आहे", अशा शब्दांत पिनीला यांनी समारोप केला.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने