ब्युरो टीम : लसूण हा त्याच्या औषधी गुणधर्मांसाठी ओळखला जातो. परंतु तुम्हाला माहिती आहे का, जास्त लसूण खाल्ल्यानं आरोग्याच्या संबंधित काही समस्या देखील उद्भवू शकतात. चला तर, लसूण खाणे किती फायदेशीर आहे, व तो जास्त खाल्ल्यानं काय तोटे होऊ शकतात? हे आज आपण जाणून घेऊ.
आरोग्याच्या संबंधित एखादी समस्या तुम्हाला असेल, तर तुम्ही तुमचं लसूण खाण्याचं प्रमाण योग्य आहे ना, याकडे लक्ष देणं आवश्यक आहे. लसणाचा आहारात योग्य प्रमाणात समावेश करा. एका दिवसात एक ते दोन लसणाच्या पाकळ्या म्हणजेच 3 ते 4 ग्रॅम लसूण खाल्ल्यास आरोग्याला फायदा होतो, असं संशोधनात आढळून आलं आहे.
पचनाची समस्या
लसणामध्ये एक खास प्रकारचे फ्रुक्टोन्स असतात, जे एक प्रकारचे कार्ब आहे. ज्यामुळे जास्त लसूण खाल्ल्यानं पोटात गॅस तयार होतो, पोट फुगते, पोट दुखू लागते. जर तुम्ही अशा प्रकारच्या समस्येला वारंवार सामोरं जात असाल, तर तुम्ही जास्त प्रमाणात लसूण खात तर नाहीत ना? हे सर्वात प्रथम पहा.
गॅस्ट्रोएसोफेगल रिफ्लक्स डिसीज
जर तुम्हाला गॅस्ट्रोएसोफेगल रिफ्लक्स डिसीजची समस्या असेल, तर तुम्ही लसूण खाणं कमी करावे. कारण जेव्हा पोटातील आम्ल अन्ननलिकेत परत जाते, तेव्हा ही समस्या उद्भवते. यामध्ये छातीत जळजळ होणे, मळमळ होणे यासारखी लक्षणे दिसतात.
रक्तस्त्राव होण्याचा धोका
हेल्थलाइनच्या वृत्तानुसार, संशोधनात असं आढळलं आहे की लसूण खाल्ल्यानं रक्त गोठत नाही, ज्यामुळे रक्तस्त्राव होण्याचा धोका वाढतो. विशेषत: ज्यांची एखादी शस्त्रक्रिया झाली आहे किंवा जे रक्त पातळ व्हावे, यासाठी औषधे घेत आहेत, त्यांनी लसूण जास्त खाणे टाळावे.
तोंडाची दुर्गंधी येते
लसणामध्ये सल्फर मुबलक प्रमाणात आढळते, जे आरोग्यासाठी विविध प्रकारे फायदेशीर आहे. मात्र जास्त लसूण खाल्ल्यानं तोंडाची दुर्गंधी येण्याची समस्या उद्भवू शकते. जर तुम्ही कच्चा लसूण खाल्ला तर ही समस्या उद्भवण्याची शक्यता जास्त असते
जास्त लसूण खाल्ल्याचे साइड इफेक्ट्स
जवळपास प्रत्येकाच्या घरात स्वयंपाकात लसणाचा वापर केला जातो. यामुळे जेवणाला एक वेगळीच चव तर येतेच, शिवाय रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी असे अन्न उपयुक्त ठरते. मात्र जेवणाची चव चांगली व्हावी, या नादात तुम्ही दिवसभरात भरपूर लसूण सेवन केल्यास आरोग्याच्या दृष्टिनं नुकसानही होऊ शकते.
टिप्पणी पोस्ट करा