ब्युरो टीम : वर्ष २०२५ हे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे ३०० वे जन्मवर्ष आहे. या निमित्ताने, त्यांचे जन्मगाव चौंडी (जि. अहिल्यानगर) या ठिकाणी ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी अभिवादन समारोह’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ‘लोकमाता अहिल्याबाई होळकर त्रिशताब्दी समारोह समिति’ द्वारे होत आहे. महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था ही या कार्यक्रमाची सह-आयोजक आहे. द ९ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळात होणाऱ्या या कार्यक्रमात देशभरातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य केलेल्या सुमारे ४०० कर्तृत्ववान महिला सहभागी होणार आहेत.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांना अभिवादन आणि राष्ट्रहितार्थ वैचारिक मंथन हे या कार्यक्रमाचे स्वरूप असणार असून उपस्थितांमध्ये प्रशासकीय श्रेणी, धार्मिक, उद्योजक, अभ्यासक, सामाजिक कार्यकर्त्या अशा विविध श्रेणींचे प्रतिनिधित्व करणाऱ्या महिलांचा सहभाग असणार आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (नवी दिल्ली) च्या कुलपति डॉ. श्रीमती शांतिश्री पंडित यांच्या हस्ते होणार आहे. तर, समारोप सत्रात लोकमाता अहिल्याबाई होळकर त्रिशताब्दी समारोह समितीच्या सचिव कॅप्टन श्रीमती मीरा दवे या संबोधित करणार आहेत. दिवसभराच्या कार्यक्रमात परिसंवाद, चर्चा सत्र व सांस्कृतिक कार्यक्रमांचा समावेश असणार आहे.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या चरित्रापासून प्रेरणा घेऊन विविध भौगोलिक व सामाजिक क्षेत्रांत विधायक कामांची आखणी व उभारणी करणे, हा या अभिवादन सभेचा प्रधान हेतु आहे.
टिप्पणी पोस्ट करा