ब्युरो टीम : अमरावती येथील कोठारा लेप्रसी मिशन हॉस्पिटल आणि सहायक संचालक आरोग्य सेवा कुष्ठरोग कार्यालयातर्फे राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत अधिकारी आणि कर्मचारी यांचे दोन दिवसीय प्रशिक्षण कोठारा येथे पार पडले. 'कुष्ठरोगासंबंधी अपंगत्व प्रतिबंध' यावर १६ आणि १७ एप्रिल रोजी हे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते.
प्रशिक्षणामध्ये कोठारा लेप्रसी मिशन हॉस्पिटलचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. मिलिंद चव्हाण, आयएलईपी एनएलईपी कन्सल्टंट सुरेश धोंडगे आणि अलर्ट इंडियाचे अन्सारी यांनी कुष्ठरोगाचे विविध पैलू आणि प्रतिबंधात्मक उपायांवर मार्गदर्शन केले.
प्रशिक्षणात प्रत्यक्ष रुग्णांची तपासणी, रोगनिदान यासारख्या बाबींचे प्रशिक्षण देण्यात आले. जिल्हास्तरीय अवैद्यकीय पर्यवेक्षक दीपक गडलिंग यांनी प्रशिक्षणाचे महत्त्व सांगितले. अलर्ट इंडियाचे फिजिओथेरपिस्ट अन्सारी यांनी समाजामध्ये वावरताना 'लेप्रसी माइंडसेट' ठेवून लोकांकडे पाहण्याची गरज व्यक्त केली. लवकर निदान आणि उपचार झाल्यास कोणत्याही व्यक्तीला कुष्ठरोगामुळे होणारे संभाव्य अपंगत्व टाळता येऊ शकते, असे त्यांनी सांगितले.
सहाय्यक संचालक डॉ. पूनम मोहोकार यांनी कोठारा लेप्रसी मिशन हॉस्पिटलचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. मिलिंद चव्हाण, पंचानन गोरैन, मिलिंद चांदेकर आणि त्यांच्या चमूचे आभार मानले.
टिप्पणी पोस्ट करा