Beed :नारळी सप्ताहाच्या माध्यमातून समाज घडविण्याचे मोलाचे कार्य : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विक्रम बनकर (ब्युरो टीम) :  'बीड जिल्ह्याला  नारळी सप्ताह, अध्यात्म व विचारांची मोठी परंपरा लाभली आहे. संत वामनभाऊ यांनी सुरू केलेली सप्ताहाची परंपरा अखंडपणे ९३ वर्ष सुरू आहे.  या परंपरेच्या माध्यमातून समाज घडविण्याचे मोलाचे कार्य होत आहे,' असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले. गहिनीनाथ गडाचा विकास करताना बीड जिल्ह्याला पाणीदार जिल्हा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

शिरूर कासार तालुक्यातील घाटशीळ पारगाव येथे श्री संत वामनभाऊ महाराज यांच्या ९३ व्या नारळी सप्ताहासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे, मठाधिपती विठ्ठल बाबा महाराज, वक्फ बोर्डाचे अध्यक्ष समीर काझी, आमदार सुरेश धस, नमिता मुंदडा, मोनिका राजळे, माजी आमदार जयदत्त क्षीरसागर, माजी आमदार भीमराव धोंडे, विभागीय आयुक्त दिलीप गावडे, विशेष पोलिस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र, जिल्हाधिकारी अविनाश पाठक उपस्थित होते.

पहा व्हिडिओ : चाफेकर बंधुंचे स्मारक देशभक्तीचे संस्कार देणारे केंद्र ठरेल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

फडणवीस पुढे म्हणाले, 'गहिनीनाथ गडाच्या विकासाचे काम सुरू केले आहे व अजून पुढे विकासाची ही कामे करायची आहेत. संतानी दाखविलेला भक्तीचा मार्ग समाजाने सोडलेला नाही. समाज घडविणाऱ्या या परंपरेत समाजातील सर्व घटकांचा सहभाग दिसून येत आहे. यामध्ये मुस्लिम समाज बांधव देखील सहभागी झाले, याचा आनंद आहे.  आमचे नेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांच्यामुळे बीड जिल्ह्याशी वेगळे नाते निर्माण झाले आहे. आज मला वामनभाऊंच्या या सप्ताहाच्या परंपरेत सहभागी होऊन आशीर्वाद घेता आला याचा मनस्वी आनंद असल्याचे ते म्हणाले.

पहा व्हिडिओ : विधानसभा सभापती प्रा.राम शिंदे ते उपमुख्यमंत्री अजित पवार, आमदार रोहित पवार स्पष्टच बोलले

'गहिनीनाथ गडावर येणाऱ्या प्रत्येक भक्ताची उत्तम व्यवस्था झाली पाहिजे, गडासोबतच या परिसरातील भाविकांच्या सोई सुविधांचा तसेच या परिसराचा  देखील विकास करण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे सांगून श्री. फडणवीस म्हणाले, मराठवाडा व बीड जिल्ह्याला कायमस्वरुपी दुष्काळमुक्त करण्यासाठी शासनाने कृष्णेचे पाणी आष्टीपर्यंत आणले आहे. ते पाणी संपूर्ण बीड जिल्ह्यात पोचविण्याचा आपला प्रण आहे. मराठवाडा व बीड जिल्ह्याला पाणीदार करण्यासाठी ५३ टीएमसी पाणी गोदाखोऱ्यात आणण्याच्या आराखड्याला देखील मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे या परिसरातील दुष्काळ कायमचा मिटेल. आजच्या या पिढीने दुष्काळ पहिला, तो पुढच्या पिढीला पाहू देणार नाही, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.

पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'संत वामनभाऊ, संत भगवान बाबा यांनी या भागातील लोकांना आध्यात्मिक गोडी निर्माण करणारी सप्ताहाची परंपरा सुरू केली, ती अखंडपणे सुरू आहे. गहिनीनाथ गडाच्या विकासासाठी तसेच बीड जिल्ह्याच्या सर्वागीण विकासासाठी मुख्यमंत्री महोदय आपल्यासोबत आहेत, त्यामुळे येत्या काळात बीड जिल्हा नक्कीच सुजलाम, सुफलाम होईल,' असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 

यावेळी गडाचे मठाधिपती विठ्ठल महाराज यांनी संत वामनभाऊ यांनी ९३ वर्षापूर्वी सुरू केलेल्या अखंड नारळी सप्ताह परंपरेबाबत माहिती दिली. यावेळी बीड, अहिल्यानगर जिल्ह्यातील भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पहा व्हिडिओ

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने