Beed :सुटीच्या दिवशी रणरणत्या उन्हात जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांचा दौरा


ब्युरो टीम : रविवार (27 एप्रिल) रोजी जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन  , बीडच्या उपविभागीय अधिकारी कविता जाधव , बीडचे तहसीलदार चंद्रकांत शेळके , जिल्हा नियोजन अधिकारी सुधाकर चिंचाणे , जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्रीकृष्ण शिंदे यांच्यासह रखरखत्या उन्हात दौऱ्यावर निघाले . उद्देश एकच - शासनामार्फत शेतकऱ्यांच्या हितासाठी फार्मर आयडी काढून देण्याची प्रक्रिया सुरू आहे , तथापि त्यास पाहिजे तसा प्रतिसाद जिल्ह्यातून नाही  म्हणून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी फार्मर आयडी काढावा यासाठी ही धावपळ . सर्वात आधी जिल्हाधिकाऱ्यांचा ताफा पोहोचला शहरातील आयटीआय कॉलेज परिसरात . तेथे प्रस्तावित इंक्युबेशन सेंटर म्हणजेच नवीन उद्योजकांसाठी प्रशिक्षण केंद्राची जागा पाहण्यासाठी . त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी जेथे शेतकऱ्यांचे फार्मर आयडी काढून देण्याचे काम सुरू आहे , अशा एक-दोन ठिकाणी घेऊन चला अशा सूचना केल्या . त्यानुसार तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी वासनवाडी ग्रामपंचायत येथे ताफा वळविला . याठिकाणी वासनवाडी येथील सरपंच  गणेश खोड , अशोक भाऊले , नंदकुमार खोड व गावातील नागरिक  , मंडळ अधिकारी  बाबासाहेब तांदळे , ग्राम महसूल अधिकारी  शशांक कुलकर्णी , जगन्नाथ  राऊत , शरद घोडके उपस्थित होते .

जिल्हाधिकाऱ्यांनी उपस्थितांना फार्मर आयडी का काढावा याचे महत्त्व विशद करताना सांगितले की  देशातील प्रत्येक नागरिकाचा वेगळा आधार आयडी आहे .  त्याच पद्धतीने महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकऱ्याचा एक " युनिक फार्मर आयडी " तयार केलं जाणार आहे . केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी "ॲग्रीस्टॅक" योजनेअंतर्गत महाराष्ट्र सरकारने राज्यातील सर्व शेतकऱ्यांच्या यूनिक फार्मर आयडी आणि त्यांच्या जमीन रेकॉर्डला जोडण्याची ( लिंक करण्याची ) मोहीम सुरू आहे . सध्या त्यासंदर्भात प्रशासकीय पातळीवर  राज्यात गाव पातळीवर विशेष कॅम्प आयोजित करून एक कोटी पेक्षा जास्त शेतकऱ्यांचे युनिक फार्मर आयडी तयार केले जाणार आहेत .  विशेष बाब म्हणजे भविष्यात शेतकऱ्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ याच " युनिक फार्मर आयडी " च्या माध्यमातून मिळणार आहे . तसेच जमिनीचे खरेदी विक्रीचे व्यवहार करण्यासाठी ही भविष्यात हे युनिक फार्मर आयडी आवश्यक ठरणार आहे . त्यामुळे महसूल , कृषी आणि ग्रामविकास विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने शेतकऱ्यांनी युनिक फार्मर आयडी तयार करून घेणे महत्वाचे ठरणार आहे . "ॲग्रीस्टॅक" योजनेअंतर्गत तयार होणारे  " युनिक फार्मर आयडी " भविष्यात शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरणार आहे . पीएम किसान सन्मान योजनेचे अनुदान मिळविणे , किसान क्रेडिट कार्ड बनविणे , पीक विमा काढणे , त्या अंतर्गत परतावा मिळविणे यासाठी युनिक फार्मर आयडी आवश्यक ठरेल .  शिवाय सरकारने जाहीर केलेली पिकांची नुकसान भरपाई मिळविणे , पीक व शेती विषयक सर्वेक्षण करून घेणे , शेतमालाची एमएसपीच्या दराने विक्री करणे , कृषी विभागाच्या विविध योजना अंतर्गत कृषी निविष्ठा व इतर सेवांचा लाभ मिळविणे , बाजारपेठेची माहिती , कृषी विषयक कामासंदर्भात कृषी तज्ञांचे मार्गदर्शन मिळविणे यासाठी युनिक फार्मर आयडी आवश्यक ठरणार आहे . शेत जमिनीच्या खरेदी विक्रीच्या व्यवहारासाठी हे युनिक फार्मर आयडी आवश्यक ठरेल .एवढंच नाही तर सरकारलाही या युनिक फार्मर आयडीच्या माध्यमातून कोणत्या शेतकऱ्याची कुठे किती जमीन आहे . कोणता शेतकरी कोणकोणत्या योजनांचा लाभ घेत आहे हे सर्व एका क्लिकवर माहीत होणार आहे . या युनिक फार्मर आयडीच्या माध्यमातून सरकारला चालू हंगामात राज्यातील किती शेतकऱ्यांनी कोणते पीक घेतले आहे , याची माहिती एका क्लिक वर मिळेल . यासाठी सर्व शेतकरी बंधू आणि भगिनींनी युनिक फार्मर आयडी काढून घ्यावा , असेही जिल्हाधिकारी यांनी आवाहन केले . यावेळी वासनवाडी येथील शेतकरी मदन घाटे यांना तात्काळ समोरासमोर फार्मर आयडी काढून दिला .

त्यानंतर प्रस्तावित विमानतळाची जागा बघण्याचा मानस जिल्हाधिकारी यांनी व्यक्त केला  . त्यानुसार कामखेडा येथील सुमारे साडेतीन किलोमीटर लांबीची व 350 मीटर रुंदीच्या प्रस्तावित धावपट्टीची व परिसराची पाहणी जिल्हाधिकाऱ्यांनी केली . यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्रीकृष्ण शिंदे , उपविभागीय अधिकारी कविता जाधव यांनी माहिती दिली . तहसीलदार चंद्रकांत शेळके  , मंडळ अधिकारी अंगद काशीद यांनी नकाशा आधारे प्रस्तावित विमानतळाच्या हद्दी खुणा  , कोणते गट समाविष्ट होतील यासंदर्भात सविस्तर माहिती सांगितली . यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी कामखेडा येथील सी एस सी केंद्राला भेट दिली  . यावेळी सरपंच बिलाल पटेल , सचिन जमदाडे , गजानन फाटे , सय्यद मोहम्मद सय्यद उस्मान , गणेश नेवडे , अरुण पवार , परमेश्वर पवार , रज्जाक शेख , प्रकाश वाघमारे , अब्दुल रहीम उस्मान शेख , सलीम शेख , मंडळ अधिकारी अंगद काशिद , अनिल तांदळे , ग्राम महसूल अधिकारी शरद घोडके , कृष्ण रत्नपारखे , गणेश गायकवाड , विकास ससाणे , आप्पासाहेब पवार उपस्थित होते . यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी ॲग्रीस्टॅक प्रकल्पातर्गत फार्मर आयडी काढण्याचे काय महत्त्व आहे , याबद्दल सविस्तर माहिती दिली . तसेच सय्यद मोहम्मद सय्यद उस्मान या शेतकऱ्याचा फार्मर आयडी समोर काढून घेतला . गावकऱ्यांनीही  जिल्हाधिकाऱ्यांशी मनमोकळेपणाने संवाद साधला  .

रखरखत्या उन्हात , सुट्टीच्या दिवशी जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी पाहणी दौरा केला  . शेतकऱ्यांशी चर्चा केली , त्यांच्या समस्या जाणून घेतल्या . फार्मर आयडी काढण्यासाठी तळमळ व्यक्त केली . त्यामुळे सर्वसामान्य शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त केल्या जात आहे. 

जिल्ह्यात सर्वत्र उपविभागीय अधिकारी , तहसीलदार ,  मंडळ अधिकारी , ग्राम महसूल अधिकारी यांच्यामार्फत तसेच गटविकास अधिकारी  , ग्रामसेवक  , तालुका कृषी अधिकारी , कृषी सहाय्यक यांच्यामार्फत फार्मर आयडी काढून देण्याचे काम वेगाने सुरू आहे . नागरिकांनी सुद्धा स्थानिक तलाठी , ग्रामसेवक , कृषी सहाय्यक यांच्याशी संपर्क साधून पुढील दोन दिवसात शंभर टक्के फार्मर आयडी ॲग्रीस्टॅक प्रकल्पांतर्गत काढून घ्यावेत , असे आवाहन यावेळी जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी केले 

पहा व्हिडिओ : चला हवा येऊ द्या फेम योगेश शिरसाट यांची यशामागची खडतर कहाणी, पहिल्यांदाच त्यांच्या तोंडून!


0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने