ब्युरो टीम : अखिल भारतीय विद्युत क्रीडा नियंत्रण मंडळाच्या ४६ व्या क्रीडा स्पर्धेचे उदघाटन महापारेषणच्या कराड परिमंडलाच्या मुख्य अभियंता तथा क्रीडा स्पर्धा आयोजन समितीच्या अध्यक्षा श्रीमती शिल्पा कुंभार यांच्या हस्ते रोप जलार्पण करून थाटात करण्यात आले.
याप्रसंगी महावितरणचे प्रादेशिक संचालक तथा कार्यकारी संचालक (नियोजन) भुजंग खंदारे, महानिर्मितीचे कार्यकारी संचालक (मानव संसाधन) डॉ. नितीन वाघ, महावितरणचे प्रादेशिक संचालक परेश भागवत, महावितरणचे मुख्य अभियंता स्वप्नील काटकर, महानिर्मितीचे मुख्य अभियंता संजय चोपडे, महापारेषणचे मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी तथा उपाध्यक्ष भरत पाटील, महावितरणचे मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी संजय ढोके, महानिर्मितीचे मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी पुरुषोत्तम वारजूरकर, महानिर्मितीचे सहमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी ललित गायकवाड, अधीक्षक अभियंता तथा सचिव प्रांजल कांबळे, महानिर्मितीचे महाव्यवस्थापक (मानव संसाधन) आनंद कोंत, क्रीडा स्पर्धेचे निरीक्षक सुरेंदर शेवकंद, महावितरणचे उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी शिरीष काटकर, महानिर्मितीचे कल्याण अधिकारी प्रसाद निकम उपस्थित होते.
येथील शिवाजी विद्यापीठात दि. १७ ते १९ एप्रिल २०२५ या कालावधीत या स्पर्धा होत आहेत. यामध्ये प्रामुख्याने ऍथलेटिक्स, कॅरम व व्हॉलीबॉल स्पर्धेचा समावेश आहे. या स्पर्धा महापारेषण, महानिर्मिती, महावितरण कंपनीच्या संयुक्त विद्यमाने होत आहेत. देशभरातून सुमारे एक हजार महिला व पुरुष खेळाडू यामध्ये सहभागी झाले आहेत.
क्रीडा संकुलात सकाळी दहा वाजता सर्व खेळाडूंनी संचलन करीत पाहुण्यांना मानवंदना दिली. तदनंतर क्रीडा ज्योतीचे आगमन व प्रज्वलन झाले. तसेच क्रीडा ध्वजारोहणानंतर महाराष्ट्र गीत सादर करण्यात आले. या वेळी शिवकालीन मर्दानी खेळाचे सादरीकरण व मल्लखांब प्रात्यक्षिक करण्यात आले. चषकाचे अनावरणही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महापारेषणच्या कराड परिमंडलाच्या मुख्य अभियंता तथा क्रीडा स्पर्धा आयोजन समितीच्या अध्यक्षा शिल्पा कुंभार होत्या. या वेळी परेश भागवत, डॉ. नितीन वाघ, भुजंग खंदारे यांनी मार्गदर्शनपर भाषणे केली.
अध्यक्षीय भाषणात श्रीमती कुंभार म्हणाल्या, ``खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी व त्यांच्यातील `स्पिरीट` जागरूक ठेवण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन केले आहे. यामध्ये पुरूष व महिलांनी खिलाडूवृत्ती जपून चांगल्या खेळाचे प्रदर्शन करावे. या क्रीडा उत्सवात मन व शरीर सदृढ ठेवण्याकडे खेळाडूंनी लक्ष दिले पाहिजे.``
कार्यक्रमाचे प्रास्ताविक ललित गायकवाड व प्रांजल कांबळे यांनी केले. सूत्रसंचालन महेंद्र कुलकर्णी व सुरेश पाटील यांनी केले. आभार पुरुषोत्तम वारजूरकर यांनी मानले. शेवटी राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
टिप्पणी पोस्ट करा