ब्युरो टीम :अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर होणारे बालविवाह रोखण्यासाठी सोशल मीडियाचा प्रभावी वापर करून, दुर्गम भागात जनजागृती करावी, अशा सूचना उपजिल्हाधिकारी (प्रशासन) तुकाराम हुलवळे यांनी आज दिल्या.
महिला व बालकल्याण विभाग जिल्हा परिषद नाशिक, युनिसेफ एस.बी.सी.३ यांच्या संयुक्त विद्यमाने सुरु असलेल्या बालविवाह निर्मूलन प्रकल्प अंतर्गत बालविवाह निर्मूलन जिल्हा कृती दलाची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृह येथे उपजिल्हाधिकारी श्री. हुलवळे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रताप पाटील व विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
श्री. हुलवळे यांनी बालविवाहाचे प्रमाण अधिक असलेल्या गावांमध्ये सक्षम युवा शक्ती कार्यक्रमांतर्गत सक्षम दिवस राबविला जाणार असल्याचे सांगितले. बालविवाह मुक्त जिल्हा कृती आराखडा तयार करण्यात आला असून, यामध्ये ग्रामपंचायत, महिला व बालविकास विभाग, शिक्षण विभाग, आरोग्य विभाग तसेच जिल्हा बाल संरक्षण कक्ष या विभागांमार्फत आराखडा अंमलबजावणी सुरु असल्याचे सांगितले. बालविवाह जिल्हा मुक्त करण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजना आणि १२५ शाळेत घेण्यात आलेल्या विद्यार्थी व पालक सत्राबाबत यावेळी माहिती दिली.
अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर बालविवाह होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याअनुषंगाने सर्व यंत्रणांनी समन्वयाने गावागावात जनजागृती करावी. यात प्रामुख्याने पोलीस विभाग, ग्रामपंचायत विभाग, शिक्षण व आरोग्य विभाग तसेच महिला व बालविकास विभाग यांनी बाल कल्याण समितीच्या मदतीने गावात जनजागृती करावी तसेच सोशल मीडियाचा वापर करून जास्तीत जास्त IEC पोस्टर फिल्म यांची प्रचार, प्रसिद्धी करून जनजागृती करावी आणि अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर होणारे बालविवाह थांबवावे. दुर्गम तालुक्यातील सर्व संबंधित विभागांनी जनजागृती व १०९८ प्रचार प्रसिद्धी कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर घ्यावेत आणि होणारे बालविवाह रोखण्यासाठी १०९८ या नंबर वर माहिती द्यावी. १०९८ या टोल फ्री नंबरवर माहिती दिल्यास संबंधित व्यक्तीचे नाव गोपनीय ठेवले जाते. असे श्री. हुलवळे यांनी सांगितले. या बैठकीस विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्यने उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा