Shirdi :शेतकऱ्यांना बंदिस्त पाइपलाइनने पाणी देण्याचा विचार, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

ब्युरो टीम : निळवंडे धरणाचे काम पूर्ण होण्यासाठी अकोले तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठे योगदान असून, लाभक्षेत्रातील शेवटच्या शेतकऱ्यांपर्यंत पाणी पोहोचवण्यासाठी बंदिस्त पाइपलाइनद्वारे पाणी पुरवण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे, अशी माहिती राज्याचे जलसंपदा मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. निळवंडे कालव्यांच्या अस्तरीकरणासंदर्भात शेतकऱ्यांच्या भावना लक्षात घेऊन एकत्रित अहवाल सादर करण्याच्या सूचना त्यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना यावेळी दिल्या.

अकोले तालुक्यातील निळवंडे लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी संगमनेर येथे पालकमंत्री विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. या वेळी आमदार डॉ. किरण लहामटे, अमोल खताळ, माजी आमदार वैभव पिचड, तहसीलदार धीरज मांजरे, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता प्रदीप हापसे, कैलास ठाकरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्रीनिवास वर्पे आदी उपस्थित होते.

शेतकऱ्यांनी उपस्थित केलेल्या कालव्यांच्या अस्तरीकरणासंदर्भातील, पाणीपुरवठ्याच्या तसेच रस्त्यांच्या प्रश्नांबाबत  शेतकऱ्यांच्या भूमिकेला जलसंपदा विभाग प्राधान्य देईल. स्थानिक लोकप्रतिनिधींच्या मताचा विचार करून सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे पालकमंत्री विखे पाटील म्हणाले.

निळवंडे लाभक्षेत्रातील रस्त्यांचे आता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून सिमेंट काँक्रिटीकरण करण्यात येईल. धरणाचे लाभक्षेत्र मोठे असल्याने शेवटच्या शेतकऱ्यालाही पाणी मिळावे, यासाठी मध्यप्रदेशातील मोहनपुरा व कुंडलिया जलाशयांप्रमाणे स्काडा प्रणालीचा वापर करून बंदिस्त पाइपलाइनद्वारे पाणीपुरवठ्याचा विचार करण्यात येत आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

पाण्यामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या तसेच धरणग्रस्तांच्या प्रश्नांवर स्वतंत्र बैठक घेण्यात येईल. निळवंडे प्रकल्पासाठी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर दाखल गुन्हे मागे घेण्यासाठी मंत्रिमंडळासमोर अहवाल सादर करून निर्णय घेण्यासाठी पाठपुरावा केला जाईल, अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली.

निळवंडे जलाशयाला स्व. मधुकरराव पिचड यांचे नाव देण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून योग्य निर्णय घेण्याचा प्रयत्न करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

या वेळी आमदार डॉ. किरण लहामटे व माजी आमदार वैभव पिचड यांनीही आपली मते मांडली.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने