Nashik : कमवा आणि शिका! नाशिक जिल्हा परिषदेत बारावी उत्तीर्ण विद्यार्थांना काम करून शिक्षणाची संधी


ब्युरो टीम:  इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ (IGNOU) यांच्या बीबीए़ (Services Management) या दूरस्थ पदवी अभ्यासक्रमासाठी शिक्षण घेणाऱ्या अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती व भटक्या जमाती  प्रवार्गातील विद्यार्थ्यांसाठी शिका व कमवा योजनेंतर्गत नाशिक जिल्हा परिषदेच्या विविध विभागांमध्ये काम करून पदवी शिक्षण करण्याची संधी मिळणार आहे. यासाठी नाशिक जिल्हा परिषदेच्या कार्यक्षेत्रातील 18 ते 22 वर्षे  वयोगटातील नुकत्याच बारावी उत्तीर्ण  विद्यार्थ्यांनी  2 जून 2025 पर्यंत https://tinyurl.com/nskzpibba2025  या संकेतस्थळावर अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा समाज कल्याण अधिकारी हर्षदा बडगुजर यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

संगणक आणि विशेषत: कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) टूल्सचा प्रभावी वापर करता येणाऱ्या नुकत्याच 12 वी उत्तीर्ण गुणवंत व होतकरू मागासवर्गीय विद्यार्थ्यांना या योजनेंतर्गत तीन वर्षासाठी डिजिटल आणि एआय सुलभक (Digital and AI Facilitator) म्हणून प्रशासकीय काम करण्याची संधी मिळणार आहे. या योजनेंतर्गत विद्यार्थ्यांनी केलेल्या कामासाठी पहिल्या वर्षी रूपये 8 हजार, दुसऱ्या वर्षी रूपये 9 हजार आणि शेवटच्या वर्षी रूपये 10 हजार इतके दरमहा विद्यावेतन तसेच प्रतिमाह रूपये 4 हजार अतिरीक्त भत्ता अदा केला जाणार आहे.

या योजनेमध्ये सलग तीन वर्ष समाधानकारकरित्या केलेले काम आणि स्वयंअध्ययन यातून तिसऱ्या वर्षाच्या शेवटी इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाची (IGNOU) बीबीए म्हणजेच Bachelor in Business Administration (Services Management) ही कामातून पदवी आणि तीन वर्षे काम केल्याचे नाशिक जिल्हा परिषदेच्या वतीने कार्यानुभवाचे प्रमाणपत्र विद्यार्थ्यांना मिळणार असल्याचेही प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आले आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने