विक्रम बनकर, अहिल्यानगर : 'मुख्यमंत्रीपद मिळावं, अशी इच्छा अजितदादा स्वतः व्यक्त करीत आहेत. त्यांच्या कार्यकर्त्यांची तशीच इच्छा आहे. मला जर व्यक्तीगत विचारलं, तर एक पुतण्या म्हणून मला देखील अजितदादा यांना मुख्यमंत्री पदाची संधी मिळावी असे वाटते,' असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) गटाचे नेते आमदार रोहित पवार यांनी माध्यमांशी बोलताना केलं आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री पदावर बसण्याची इच्छा अनेकदा जाहीरपणे बोलून दाखवली आहे. विशेष म्हणजे विधानसभा निवडणुकांवेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते अजित पवार मुख्यमंत्री होतील, अशी इच्छा देखील बोलून दाखवत होते. अनेक ठिकाणी तशी बॅनरबाजीही पाहायला मिळाली. त्यातच आता राष्ट्रवादीच्या एका कार्यक्रमात अजितदादांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदाबाबत परखड भाष्य केल्याने राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. त्यावर आता आमदार रोहित पवार यांचीही प्रतिक्रिया आली आहे.
आमदार रोहित पवार म्हणाले,'तुम्ही एखाद्या उमेदवाराला विचारलं की तुझी इच्छा काय आहे, त्यावर अनेकजण म्हणतील की सत्तेत जावं, जे सत्तेत आहेत ते म्हणतात मंत्री व्हावे, आणि जे अनेक वर्षे मंत्री आहेत त्यांची इच्छा असते मुख्यमंत्री व्हावे. नेत्यांची ती व्यक्तिगत इच्छा असते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कार्य मोठे आहे. ते अनेक वर्ष उपमुख्यमंत्री पदावर कार्यरत राहिले आहेत. आता उपमुख्यमंत्री पदाच्या वर जायचे असेल तर एकच पद राहते, ते म्हणजे मुख्यमंत्रीपद. अजितदादा यांना या तिन्ही पक्षाच्या सरकारमध्ये मुख्यमंत्री पदाची संधी मिळाली तर मी देखील त्याचं स्वागत करेल,' असेही रोहित पवार यांनी स्पष्ट केलं.
अजितदादा नेमकं काय म्हणाले होते?
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने महाराष्ट्र दिनानिमित्ताने 'गौरवशाली महाराष्ट्र' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल महिलांचा सन्मान करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ पत्रकार राही भिडे म्हणाल्या की, 'महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी महिला विराजमान झाली पाहिजे.' त्यावर अजित पवारांनी स्पष्ट शब्दात भूमिका मांडली. ते म्हणाले की, 'राही भिडे म्हणाल्या की, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची संधी महिलेला मिळाली पाहिजे. आपल्या सर्वांना तसं वाटतं. पण, त्यासाठी योग यावा लागतो. आता, मलाही कित्येकदा वाटतं की आपण मुख्यमंत्री झालं पाहिजे, पण नाही योग येत. कधी ना कधी तो योग येईल,' असे अजित पवारांनी म्हंटले होते.
पहा व्हिडिओ
टिप्पणी पोस्ट करा