Ahilyanagar :महानगरपालिकेतर्फे डेंग्यू मुक्त अहिल्यानगर अभियान


विक्रम बनकर, अहिल्यानगर : महानगरपालिकेमार्फत सुरू करण्यात आलेल्या डेंग्यूमुक्त अहिल्यानगर अभियानाच्या तिसऱ्या आठवड्यात कोठला परिसरात कोंड्यामामा चौक परिसरात भेटी देऊन तपासणी करण्यात आली. आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांच्या उपस्थितीत परिसरातील वसाहतींमध्ये असलेले पाणीसाठे, टाक्या, हौद आदींची तपासणी करून त्यात ॲबेट टाकण्यात आले. डेंग्यूच्या डासांची उत्पत्ती टाळण्यासाठी, प्रजनन साखळी तोडण्यासाठी आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळावा, असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी यावेळी केले.

आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांच्या उपस्थितीत हे अभियान राबविण्यात आले. यावेळी महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाचे प्रमुख डॉ. सतीश राजूरकर, आरोग्य केंद्राचे अधिकारी, कर्मचारी, नर्सेस, तसेच परिसरातील नागरिक उपस्थित होते. नागरी वसाहतीमध्ये पाण्याचे साठे तपासून त्यात औषध टाकण्यात आले. तसेच, पावसामुळे वसाहतीच्या परिसरातील टायर, इतर पडीक व टाकाऊ साहित्यांमध्ये साचलेले पाणी काढून स्वच्छ करण्यात आले.

डेंग्यू मुक्त अहिल्यानगरसाठी नागिरकांनी स्वतःहून अभियानात सहभाग घ्यावा. स्वतःच्या घराची तपासणी करावी. त्यात घरातील स्वच्छ पाणी साठविलेला हौद, बॅरल, छतावरील पाण्याची टाकी, अडगळीत पडलेले साहित्य व त्यात पावसाचे पाणी साठले आहे का याची तपासणी करावी. घरातील कूलर, तसेच जुन्या पध्दतीच्या फ्रिजमधील ट्रे तपासावा. त्यात डासाच्या अळ्या आहेत का, हे तपासावे. असल्यास ते रिकामे करावे. आपण स्वतःहून सहभाग घेऊन केलेल्या कामाचा, उपाययोजनेचा व्हिडिओ, फोटो महानगरपालिकेत सादर करावा. जे नागरिक सातत्याने स्वतः च्या घरापासून स्वतः सुरवात करतील व इतरांना करण्यासाठी प्रवृत्त करतील, त्यांचा मनपामार्फत सन्मान करण्यात येईल, असेही आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी म्हटले आहे.

दरम्यान, हे अभियान २० आठवडे - ५ महिने राबविण्यात येणार आहे. पुढील आठवड्यात ५ जुलै रोजी सकाळी ८ वाजता डेंग्यू मुक्त मोहिमेच्या चौथ्या आठवड्याचे अभियान हनुमान मंदिर भोसले आखाडा या परिसरात पार पडणार आहे. स्थानिक नागरिकांनी यात सहभागी व्हावे, असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी केले आहे.

पहा व्हिडिओ : संतश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने