Kundmala Bridge Collapse : कुंडमळा येथे लोखंडी पुल कोसळला; ५१ जखमी, ४ मृत्यू



ब्युरो टीम :  मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन हद्दीतील कुंडमळा (इंदुरी) येथे मोठी दुर्घटना घडली आहे. इंद्रायणी नदीवरील जुना लोखंडी पूल रविवारी (दि. १५ जून २०२५) रोजी दुपारी ३:३० वाजता अचानक कोसळला. या पुलाचा वापर इंद्रायणी नदीवरील दोन गावांना जोडणारा प्रमुख मार्ग म्हणून होत होता. सुमारे ३० वर्षांपूर्वी बांधण्यात आलेला हा पूल होता.
घटना घडली यावेळी कुंडमळा या ठिकाणी अंदाजे 100 ते 125 पर्यटक होते. लोखंडी पूल कोसळून त्या खाली काही पर्यटक अडकले असण्याची समजताच सदर ठिकाणी बचावकार्यांसाठी स्थानिक प्रशासन, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) चे 2 पथक, पिंपरी चिंचवड आयुक्तालय पोलीस अधिकारी, केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF), आपत्ती मित्र, पुणे / पिंपरी चिंचवड आणि पुणे महानगर प्रादेशिक आपत्ती प्राधिकरण (PMRDA) चे अग्निशमन दल, शिवदुर्ग संघटना, वन्यजीव संघटना यांच्यामार्फत शोधकार्य सुरू केले होते.
सदर दुर्घटनेमध्ये एकूण ५१ व्यक्ती जखमी झाले असून जखमी व्यक्तींना रुग्णवाहिकेच्या मदतीने सोमाटणे फाटा, ता. मावळ येथील पवना रुग्णालय,  मायमर हॉस्पिटल, अथर्व हॉस्पिटल आणि युनिक हॉस्पिटल मध्ये उपचारासाठी दाखल केले आहे. या घटनेत एकूण ४ व्यक्तींचा मृत्यू झाला असून पुढील कार्यवाही सुरू आहे.
सदर इंद्रायणी नदीतील कोसळलेला लोखंडी पूल क्रेनच्या सहाय्याने बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. तसेच घटनास्थळी मा. मंत्री  आपत्ती व्यवस्थापन, मा. मंत्री  मदत व पुनर्वसन, मा. पुणे विभागीय आयुक्त , मा. खासदार - बारामती लोकसभा, मा. आमदार – मावळ विधानसभा, जिल्हाधिकारी पुणे, उपविभागीय अधिकारी – मावळ, तहसीलदार मावळ, वरिष्ठ पोलीस निरीक्षक तळेगाव दाभाडे हे उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने