Pandharpur Wari :वीर हनुमान वारकरी सेवाभावी प्रतिष्ठानच्या अहिल्यानगर ते पंढरपुर पायी दिंडीचे प्रस्थान

विक्रम बनकर, अहिल्यानगर : महाराष्ट्राची आध्यात्मिक ओळख म्हणजे विठोबाची वारी. दरवर्षी आषाढी एकादशीला पंढरपूरच्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी लाखो वारकरी भावभक्तीने चालत जातात. हातात टाळ, गळ्यात भगवे उपरणे, मुखात जय जय रामकृष्ण हरीचा गजर - हा दृष्य पाहताना अंगावर शहारे येतात.ही केवळ यात्रा नाही, हे एक चालतं-जागतं भक्तिसंप्रदायाचं जिवंत रूप आहे. ही दिंडी म्हणजे संयम, श्रद्धा, भक्ती, आणि समर्पण यांचा संगम आहे. विठोबाशी असलेलं नातं हे केवळ देव-भक्ताचं नातं नाही, तर ते एक प्रेम, जिव्हाळा आणि विश्वासाचं नातं आहे. संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ, चोखामेळा - या संतांनी या वारीला आत्मा दिला. वारकर्यांची दिंडी म्हणजे चालता बोलता धर्मग्रंथच. दिंडीचे महत्त्व केवळ धार्मिक नाही, तर सामाजिकही आहे. येथे जातीभेद, वर्गभेद, श्रीमंत-गरीब या सीमा नाहीत. इथे सगळे एकसमान - भक्तिभावात एकरूप. सहकार, शिस्त, सेवा, आणि साधेपणा हे मूल्य इथे शिकायला मिळतात,  असे प्रतिपादन महंत संगमनाथ महाराज यांनी केले.

वीर हनुमान वारकरी सेवाभावी प्रतिष्ठानच्या नगर ते पंढरपुर पायी दिंडी सोहळ्याचे प्रस्थान शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणेश मंदिर येथून झाले. यावेळी श्री विशाल गणेश मंदिरचे महंत संगमनाथ महाराज, अध्यक्ष बाबासाहेब जाधव, उपाध्यक्ष राजेंद्र कानडे, सचिव झुंबर आव्हाड, खजिनदार विक्रांत राऊत, संजय महापुरे, छबुराव गाडळकर, रामदास कानडे, गोविंद सांगळे, भिमराज रासकर, यशवंत औटी, मोहन रासकर, शंकर रासकर, नंदू गाडळकर, मनोज आजबे, राहुल इवळे आदि उपस्थित होते.

या दिंडी विषयी माहिती देतांना बाबासाहेब जाधव म्हणाले, वीर हनुमान पायी दिंडी गेल्या अनेक वर्षापासूनची परंपरा आहे. ही दिंडी शिस्तबद्द होत असून, प्रत्येक वारकर्याची विशेष काळजी घेण्यात येत असते. नगर ते पंढरपुर हा 12 दिवसांचा प्रवास आहे. या दरम्यान वारकर्यांची ठिकठिकाणी नाष्टा,जेवण व राहण्याची व्यवस्था केली गेली आहे. यासाठी अनेकांचे सहकार्य लाभले असून, प्रत्येकाने आपआपली जबाबदारी स्विकारली आहे. पंढरपुरच्या पांडूरंगाच्या दर्शनाची आस लागली आहे. या दिंडीच्या माध्यमातून पुर्ण होत आहे. धार्मिक कार्यक्रम व चांगल्या नियोजनामुळे या दिंडीची दिवसेंदिवस प्रचिती वाढत आहे. पंढरपुर येथेही दर्शनाची व्यवस्था केली असल्याचे जाधव यांनी सांगितले.

प्रारंभी मार्केट यार्ड येथील हनुमान मंदिरात पादुकांची पुजा करण्यात आली. या दिंडीत भगवे पताका घेतलेले युवक, डोक्यावर तुलसीवृंदावन घेतलेल्या महिला विठ्ठल..विठ्ठला..हरिओम विठ्ठला... दिंडी चालली पंढरपुरा... चा जय घोष करत होत्या. या दिंडीत नगरसेविका सुवर्णा जाधव, विजय कोथिंबीरे, डॉ.अमोल जाधव, गणेश नन्नवरे, आदेश जाधव, आनंद सत्रे, राजेंंद्र एकाडे, हनुमान मंदिरातील पुजारी अर्जुन शिंदे श्रीराम भक्त सत्संग सेवा मंडळ, श्रीराम मंदिर नवीपेठ यांचे पदाधिकारी आदी सहभागी होते.

पहा व्हिडिओ 

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने