ब्युरो टीम : अनुसूचित जाती जमातीमध्ये येणारा पारधी समाज मुख्य समाजाच्या प्रवाहात समाविष्ट करण्यासाठी शासन विविध धोरणे राबवित आहेत. या योजनांची योग्य अंमलबजावणी करण्यासाठी अधिकाऱ्यांनी मानवी जाणीव जोपासून प्रशासकीय कामकाज करण्याचे आवाहन महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाची उपाध्यक्ष तथा सदस्य धर्मपाल मेश्राम यांनी आज येथे केले.
दस्तूर नगर येथील प्रज्ञा प्रबोधिनी अमरावती - उद्योजकता विकास प्रकल्प, विवेकानंद छात्रावास येथे पारधी विकास परिषदेला (विदर्भ प्रांत) मार्गदर्शन करताना आयोगाचे उपाध्यक्ष तथा सदस्य श्री. मेश्राम यावेळी बोलत होते.
प्रज्ञा प्रबोधिनी अमरावती - उद्योजकता विकास प्रकल्पाचे अध्यक्ष अविनाश देशपांडे, प्रदीप वडनेरकर, आशिष कावरे, अमरसिंग भोसले, आदिवासी विभागाच्या उपायुक्त जागृती कुंभरे आदी यावेळी उपस्थित होत्या.
आयोगाचे उपाध्यक्ष तथा सदस्य मेश्राम म्हणाले की, अन्य समाजाच्या तुलनेत पारधी समाज काहीसा मागे राहिला आहे. या समाजाच्या उन्नतीसाठी सर्वांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे. सर्व समाज बांधवांपर्यंत विकास गंगा पोहोचल्यावर खऱ्या अर्थाने देशाची प्रगती होईल. अधिकाऱ्यांनी मानवी जाणिवा जोपासून कामकाज करावे. या समाजाची सद्यस्थिती समजून घेण्यासाठी मी
राज्यभर पारधी समाजाच्या बेड्यांवर फिरलो. त्यांच्या गाऱ्हाणी, तक्रारी समजावून घेतल्या. कायद्याने ज्या तरतुदी आहेत, त्याचा योग्य उपयोग करुन त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे ते यावेळी म्हणाले.
आदिवासी विभागाच्या उपायुक्त श्रीमती कुंभरे यांनी यावेळी पारधी समाज बांधवांसाठी आदिवासी विभागामार्फत राबण्यात येणाऱ्या विविध तरतुदींविषयी माहिती दिली. पारधी समाज बांधवांसाठी न्युक्लिअस बजेटमधून आर्थिक सहाय्य पुरविण्यात येते. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी व्यक्ती अथवा गटांना आर्थिक सहाकार्य करण्यात येते. घरकुलासाठीही सहकार्य करण्यात येते. स्वाभिमान सबळीकरण योजनेतंर्गत पात्र लाभार्थ्यांना लाभ देण्यात येतो. आदिवासी बांधवांच्या विकासासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सुरु केलेल्या धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष योजनेअंतर्गत देखील मदत पुरविली जाते. पात्र लाभार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे त्यांनी यावेळी सांगितले.
पारधी समाज बांधवांनी विविध विषयावर निवेदने, मागण्या यावेळी सादर केल्या. त्यावर योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन आयोगाचे उपाध्यक्ष तथा सदस्य श्री. मेश्राम यांनी यावेळी दिले. कार्यक्रमाचे संचालन प्रशांत पवार यांनी तर रुपेश पवार यांनी आभार मानले.
टिप्पणी पोस्ट करा