विक्रम बनकर, अहिल्यानगर : आषाढी एकादशीनिमित्त अहिल्यानगर शहरात एक आगळीवेगळी आणि मनाला भावणारी घटना घडली. मन:स्फूर्ती प्रतिष्ठान संचलित ‘मी राजहंस – लर्निंग डेव्हलपमेंट अँड मल्टी थेरपी सेंटर फॉर चिल्ड्रन’ या संस्थेतील विशेष मुलांनी उत्साहात दिंडी काढून विठूरायाच्या दर्शनाचा आनंद लुटला.
ऑटिझम (स्वमग्नता), ए.डी.एच.डी (अति चंचलता), लर्निंग डिसबिलिटी (अध्ययन अक्षमता) यांसारख्या अडचणींवर उपचार करणाऱ्या या केंद्रातील विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषा करून टाळ-मृदुंगांच्या गजरात साजेशी भक्तीमय सजावट करून नगरमध्ये दिंडी काढली. ही विशेष बाल वारकरी दिंडी सर्वांचं लक्ष वेधून घेत होती.
पहा व्हिडिओ :आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी महापूजा
यावेळी अहिल्यानगरचे निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गिते, मन:स्फूर्ती प्रतिष्ठानचे अध्यक्ष मधुकर काळे, पदाधिकारी संतोष आहेर व दीपाली आहेर, तसेच 'मी राजहंस'च्या संचालिका तेजस्विनी आहेर आणि सर्व पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दिंडीच्या यशस्वी आयोजनासाठी सेंटरच्या संपूर्ण टीमने परिश्रम घेतले. मुलांच्या उत्साह, भक्ती आणि समर्पणाची प्रचिती देणारी ही वारी पाहणाऱ्यांना मंत्रमुग्ध करून गेली. ही वारी केवळ एक धार्मिक परंपरा नव्हती, तर समाजात समावेशकतेचा आणि संवेदनशीलतेचा दिलासा देणारा एक प्रेरणादायी उपक्रम होता.
पहा व्हिडिओ : आषाढी एकादशीनिमित्त शिर्डीतील श्री साईबाबा मंदिरात करण्यात आलेली सजावट
टिप्पणी पोस्ट करा