MP Nilesh Lanke : खासदार नीलेश लंके यांंच्या उपोषणास सुरूवात, वाचा पहिल्या दिवशी काय घडलं?

विक्रम बनकर,अहिल्यानगर : विळद बायपास ते सावळी विहीर या ७५ किलोमीटरच्या रस्त्याचे काम तात्काळ सुरू करण्याच्या मागणीसाठी खासदार नीलेश लंके यांनी आपल्या सहकाऱ्यांसह शुक्रवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषणास प्रारंभ केला. 

यावेळी बोलताना खासदार लंके यांनी सांगितले की, 'गेल्या सहा वर्षांपासून या रस्त्याच्या कामाची प्रतिक्षा असून जनतेच्या सहनशिलतेचा अंत झाला आहे. सन २०१८ पासून रखडलेले हे काम आता तिसऱ्यांदा सुरू होण्याच्या प्रतक्षेत आहे. दरवेळी नव्या तारखा, नव्या घोषणा देण्यात येतात, प्रत्यक्ष मात्र कामाला सुरूवात होत नाही.

ते पुढे म्हणाले, 'रस्त्याच्या दुरावस्थेमुळे झालेल्या अपघातात गेल्या चार वर्षात ३८८ प्रवाशांना घटनास्थळीच आपला जीव गमवावा लागला. अपघात होऊन जखमी झालेल्या व औषधोपचारादरम्यान रूग्णालयात मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तींची संख्या गृहीत धरली तर ही संख्या एक हजारांहून अधिक होते. याचा विचार करून प्रशासनाने या रस्त्याचे काम तात्काळ सुरू करणे गरजेचे आहे,' असेही खासदार लंके म्हणाले. 

जिल्ह्यातील चार आमदार व दोन खासदारांच्या मतदारसंघातून हा रस्ता जातो. असे असतानाही गेल्या अनेक वर्षांपासून या रस्त्याचे काम पूर्ण होत नाही, ही प्रशासनाचे आणि सरकारचे साफ अपयश आहे. या रस्त्याच्या कामासाठी आपण स्वतः सातत्यपुर्ण पाठपुरावा करत आहे. त्यासाठी आपण यापूर्वीही उपोषण केले होते. या रस्त्याच्या कामासंदर्भात केवळ आश्वासनांची मालिका सुरू असून कामाचा गतीने आरंभ होत नाही, असेही खासदार लंके यांनी स्पष्ट केले. यासंदर्भात पुढे बोलताना ते म्हणाले, 'या कामाची एप्रिल २०२५ मध्ये वर्क ऑर्डर  देण्यात आली आहे. अवकाळी पावसाच्या नावाखाली हे काम टाळले जात आहे ही थट्टा आहे. रस्त्याच्या दुरूस्तीच्या नावाखाली काही ठिकाणी थातुर-मातुर काम सुरू असून प्रत्यक्ष मुळ कामाला महूर्त कधी मिळणार?असा सवाल करत पावसाळयाच्या तोंडावर वर्क ऑर्डर, आणि कामाची पुढची गती अनिश्चित असल्याचे खासदार लंके म्हणाले. 

अधिकाऱ्यांशी चर्चा निष्फळ 

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाच्या अधिकाऱ्यांनी खासदार नीलेश लंके यांनी उपोषणास सुरूवात केल्यानंतर लगेच भेट घेऊन पावसामुळे दोन महिने वाट पाहून त्यानंतर काम सुरू करू, अशी भूमिका मांडली. मात्र लंके यांनी या रस्त्याची झालेली दुरावस्था, त्यामुळे झालेले अपघात व नागरिकांचे झालेले मृत्यू याची माहिती देत प्रत्यक्ष काम सुरू करा, तोपर्यंत मी आंदोलन मागे घेणार नाही, अशी ठाम भूमिका मांडली. त्यामुळे अधिकाऱ्यांची शिष्टाई फळास आली नाही.

पहा व्हिडिओ : राजकारणात आमची पीएचडी झालीय, डॉ. सुजय विखे पाटील यांचे वक्तव्य

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने