ब्युरो टीम : सांगली जिल्हास्तरीय अंमली पदार्थ विरोधी समितीची बैठक जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या अध्यक्षतेखाली व पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली. यावेळी अमली पदार्थ विषयातील भविष्यकालिन संकट व धोके लक्षात घेऊन संबंधित सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी आपली जबाबदारी गांभीर्याने व जाणिवपूर्वक पार पाडावी, असे निर्देश जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी दिले.
जिल्हाधिकारी अशोक काकडे म्हणाले, अमली पदार्थांच्या सेवनाने भावी पिढीचे नुकसान होणार आहे. त्यामुळे शाळा महाविद्यालये, तंत्रनिकेतन, आय. टी. आय. मधील विद्यार्थ्यांमध्ये यामध्ये नियमित जनजागृती करावी. त्याची अंमलबजावणी होते कि नाही, हे पाहण्यासाठी संबंधित विभागप्रमुखाने आकस्मिक भेटी द्याव्यात. वसतिगृहांची वेळोवेळी तपासणी करावी. विद्यार्थ्यांतील वर्तणुकीय बदल (बिहेव्हिरीयल चेंजेस) टिपावेत. त्याचे समुपदेशन करावे, असे त्यांनी सांगितले.
समितीच्या सदस्यांनी नियमित करावयाच्या बाबींसाठी कोड ऑफ कंडक्ट तयार करावे, अशा सूचना करून जिल्हाधिकारी अशोक काकडे म्हणाले, यापूर्वीच्या बैठकीत दिलेल्या सूचनांप्रमाणे एमआयडीसी कार्यक्षेत्रात चालू व बंद असलेल्या कारखान्यांची, मेडिकल दुकानांची तपासणी करून प्रत्येक महिन्याला त्याचा अहवाल सादर करावा. तसेच, व्यसनमुक्ती चिकित्सा, उपचार व समुपदेशन केंद्र सुरू करण्याची कार्यवाही त्वरित करावी.
पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी यावेळी अमली पदार्थांचे आव्हान महाविद्यालयीन युवकांना बाधित करणार नाही, यासाठी महाविद्यालय स्तरावर जनजागृती करण्यात येत आहे. अन्य विभागांनी केलेले व्हिडिओ, पोस्टर्स उपलब्ध करून दिल्यास सदर जनजागृती वेळी प्रदर्शित करण्यात येतील, असे सांगितले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बैठक सभागृहात झालेल्या या बैठकीस स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मिरजचे डॉ. राजकिरण साळुंखे, शासकीय रूग्णालयाचे डॉ. विभीषन सारंगकर, जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापक विद्या कुलकर्णी, एमआयडीसीच्या प्रादेशिक अधिकारी वसुंधरा बिरजे, जिल्हा माहिती अधिकारी संप्रदा बीडकर, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी प्रसाद गाजरे, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक प्रदीप पोटे यांच्यासह समितीचे सदस्य उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा