PCMC : नागरिकांच्या अर्थसंकल्पातील सक्रिय सहभागाला मिळतोय उत्स्फूर्त प्रतिसाद!

ब्युरो टीम : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अर्थसंकल्पात नागरिकांचा सक्रिय सहभाग वाढविण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या उपक्रमाला यंदाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. शहरातील विविध प्रभागांतील नागरिक आपल्या परिसरातील स्थानिक गरजा व दीर्घकालीन सुविधा लक्षात घेऊन मोठ्या प्रमाणावर अभिप्राय देत आहेत. मागील वर्षांप्रमाणे यंदाही या उपक्रमाला नागरिकांचा प्रतिसाद मिळत असून, या माध्यमातून अर्थसंकल्प अधिक लोकाभिमुख, सर्वसमावेशक व पारदर्शक होण्यास मदत होणार आहे.

या उपक्रमाद्वारे रस्ते, पादचारी मार्ग, उद्याने, कचरा व्यवस्थापन, पाणीपुरवठा, पथदिवे, सार्वजनिक सुरक्षा, आरोग्य सुविधा, वाहतूक व्यवस्थापन तसेच हरित उपक्रम अशा विविध क्षेत्रांमध्ये नागरिकांनी दिलेल्या अभिप्रायांचा विचार केला जाणार आहे. नागरिकांकडून आलेल्या अभिप्रायांचे संकलन व छाननी पारदर्शक पद्धतीने करण्यासाठी डिजिटल साधनांचा वापर केला जात आहे. छाननीनंतर त्या अभिप्रायांचा प्राधान्यक्रम ठरवून निधीचे वाटप करण्यात येईल. तरी पिंपरी चिंचवड शहरातील जास्तीतजास्त नागरिकांनी या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात येत आहे.

अभिप्राय कसा नोंदवावा?

  • नागरिकांना महापालिकेच्या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज भरून अभिप्राय नोंदवता येईल.
  • तसेच नागरिक या https://www.surveymonkey.com/r/D8TBZRH लिंकला भेट देऊन ऑनलाईन अभिप्राय नोंदवू शकता.
  • नागरिकांनी दिलेल्या अभिप्रायांचा विचार करून त्या भागातील विकास कामांसाठी त्यांच्या परिसरात वसूल होणाऱ्या मालमत्ता कराच्या १० टक्के निधीची तरतूद केली जाणार आहे.
  • नागरिकांनी दिलेले अभिप्राय एकदा नोंद झाल्यानंतर त्यांची ऑनलाईन ट्रॅकिंग सुविधा देखील उपलब्ध होणार आहे, ज्यामुळे पारदर्शकता अधिक वाढेल.

अर्थसंकल्पात कोणत्या कामांचा समावेश असावा, यासाठी नागरिकांनी दिलेल्या अभिप्रायांमुळे स्थानिक गरजांची अचूक नोंद होऊन शहराच्या विकासाला दिशा मिळते. या प्रक्रियेमुळे केवळ सुविधा उभारणीच नव्हे तर नागरी जीवनमान सुधारणा, सार्वजनिक सेवांमध्ये समानता आणि संसाधनांचा योग्य वापर साध्य होतो. नागरिकांच्या अभिप्रायांचा विचार करून आणि कामांचा प्राधान्यक्रम ठरवून त्यासाठी अर्थसंकल्प २०२५-२६ मध्ये जवळपास १३९ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. यंदाही नागरिकांनी अधिकाधिक अभिप्राय देऊन अर्थसंकल्प २०२६-२७ लोकाभिमुख बनवावा.

शेखर सिंह, आयुक्त तथा प्रशासक, पिंपरी चिंचवड महापालिका

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने