Aditi Tatkare :मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान हे लोकायुक्त अभियान - मंत्री आदिती तटकरे

ब्युरो टीम : ग्रामविकास मंत्रालयाकडून मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान हे लोकायुक्त अभियान 17 सप्टेंबर ते 31 डिसेंबर 2025 दरम्यान राबविण्यात येणार आहे. गावांचा विकास होण्याच्या दृष्टीने हे एक सकारात्मक पाऊल आहे. या अभियानात सर्व ग्रामस्थांनी मिळून एकत्रित काम केल्यास गावांचा विकास शक्य असल्याचे मत महिला व बालविकास मंत्री कु.आदिती तटकरे यांनी  केले. रायगड जिल्हा परिषद अंतर्गत मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान जिल्हास्तरीय कार्यशाळा कुरुळ येथील आरसीएफ सभागृहात पार पडली. यावेळी त्या बोलत होत्या.

यावेळी रोहयो मंत्री भरत गोगावले,यशदाचे उपमहासंचालक डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, जिल्हाधिकारी  किशन जावळे, मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, जिल्हा पोलीस अधीक्षक आचल दलाल, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बडे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रकल्प संचालक प्रियदर्शनी मोरे, सामान्य प्रशासन विभाग उपमुख्य कार्यकारी अधिकारी जालिंदर पठारे, ग्रामपंचायत विभाग उपमुख्य कार्यकारी अधिकारी विशाल तनपुरे, प्राथमिक शिक्षण अधिकारी ललिता दहीतुले, माध्यमिक शिक्षण अधिकारी महारुद्र नाळे, आरोग्य अधिकारी डॉ. मनिषा विखे यांच्यासह जिल्हा परिषद खातेप्रमुख, गट विकास अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी, सरपंच उपस्थित होते.

यावेळी तटकरे म्हणाल्या की, ग्रामपंचायत म्हणजे राज्य व केंद्र सरकारच्या योजना जनतेपर्यंत पोहचविण्याचे सर्वोत्तम साधन आहे. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान सात घटकांवर आधारित आहे. सर्व ग्रामस्थांनी मिळून एकत्रित काम केल्यास गावांचा विकास शक्य आहे. गाव अधिकाधिक स्वच्छ ठेवण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करावेत तसेच जलसमृद्ध गाव करणे हा प्रमुख दृष्टिकोन असावा, असे आवाहनही मंत्री आदिती तटकरे यांनी केले.

गावांचा शाश्वत व सर्वांगीण विकास करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत योजना जनतेच्या दारी पोहोचतील. गाव सक्षम असेल तर जिल्हा सक्षम होईल, जिल्हा सक्षम झाला तर राज्य आणि राज्य सक्षम झाले ते देश सक्षम होईल. सर्व योजनांची प्रभावी अंमलबजावणी करा, हे अभियान यशस्वी करण्यासाठी सर्वोतोपरी सहकार्य करू, असे आश्वासन रोहयो मंत्री भरत गोगावले यांनी केले.

या अभियानंतर्गत सात घटकांवर काम करायच आहे. लोकाभिमुख प्रशासन तयार करायचे आहे. जिल्ह्यातील 507 ग्रामपंचायतींच्या नावे सेतू केंद्र असून, जनतेला आवश्यक असलेले दाखले ग्रामपंचायत मधून मिळत आहेत. प्रत्येक ग्रामपंचायत हद्दीत किमान एक हेक्टर जागेवर बांबू लागवड करण्यात येत आहे. यामधून ग्रामपंचायतींना आर्थिक उत्पन्न मिळेल. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान जिल्ह्यात प्रभावीपणे राबविण्यात येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिली.

ग्राम समृद्ध करण्यासाठी अभियानांतर्गत सर्वांनी प्रयत्न करावेत. अभियानांतर्गत ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हापरिषद यामध्ये एक स्पर्धा आहे. अभियानामुळे योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे करण्यात येईल. सर्वांना हे अभियान आपले वाटावे असे काम करून अभियानात जनतेचा सहभाग मिळवावा, असे मार्गदर्शन मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांनी केले.

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान उत्तमप्रकारे कसे राबविण्यात यावे याबाबत यशदाचे उपमहासंचालक डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी उपस्थित ग्रामपंचायत अधिकारी व सरपंच यांना मार्गदर्शन केले. अनेक सरपंच व अधिकारी यांच्यासोबत चर्चा केल्यानंतर हे अभियान राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती मल्लिनाथ कलशेट्टी स्पष्ट केले. 

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने