ब्युरो टीम : अहिल्यानागर जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर स्थानिक परिस्थितीचा आढावा घेऊन शाळांना सुट्टी देण्याचा अधिकार ग्रामस्तरावरील शालेय व्यवस्थापन समित्यांना प्रदान करण्यात आला आहे. दरम्यान अहिल्यानगर जिल्ह्याला आज पावसाचा ऑरेंज अलर्ट तर उद्यासाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे. तसेच जिल्ह्यातून वाहणाऱ्या प्रमुख नद्यांमध्ये धरणातून विसर्ग सुरू आहे.
जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने या संदर्भात आदेश निर्गमित केले. आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ मधील कलम २५ अन्वये जिल्हाधिकारी हे प्राधिकरणाचे अध्यक्ष असून शासनाच्या परिपत्रकानुसार शाळांना सुट्टी जाहिर करण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना आहेत. जिल्ह्यातील १९ महसूल मंडळांत अतिवृष्टी झालेली असून पाथर्डी व शेवगाव तालुक्यातील काही गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. तसेच भारतीय हवामान खात्याने जिल्ह्यासाठी अतिवृष्टीचा इशारा दिला आहे.
या पार्श्वभूमीवर १५ व १६ सप्टेंबर २०२५ या कालावधीत आवश्यकता असल्यास शाळा बंद ठेवण्याबाबतचा निर्णय शालेय व्यवस्थापन समिती घेऊ शकेल. सर्व मुख्याध्यापकांनी समिती अध्यक्षांसह बैठक घेऊन स्थानिक परिस्थितीचा आढावा घेणे आवश्यक आहे. तथापि या कालावधीत मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कार्यालयीन वेळेत शाळेत उपस्थित राहून स्थानिक प्रशासनाच्या आदेशानुसार आपत्ती व्यवस्थापनासंबंधी कामकाज करणे बंधनकारक राहील, असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.
धरणातून सुरू असणारा विसर्ग
(दि.15/09/2025, दुपारी 12 .00 वा.)
भिमा नदी- दौंड पूल विसर्ग(मॅन्युअल गेज) - 7,627 क्युसेक.
गोदावरी नदी -
अ ) नांदूर मधमेश्वर धरण विसर्ग- 3,155 क्युसेक.
ब) जायकवाडी धरण विसर्ग - निरंक.
प्रवरा नदी -
अ)भंडारदरा धरण विसर्ग - निरंक .
ब) निळवंडे धरण विसर्ग - 1,032 क्युसेक.
क) ओझर बंधारा विसर्ग - 6,18 क्युसेक.
मुळा नदी - मुळा धरण विसर्ग - 1,000 क्युसेक.
घोड नदी - घोड धरण विसर्ग - 8,000 क्युसेक.
विसापूर धरण - हंगा नदी विसर्ग - 1,10 क्युसेक.
कुकडी नदी- येडगाव धरण विसर्ग - 7,50 क्युसेक.
सीना नदी - सीना धरण विसर्ग - 1,501 क्युसेक.

टिप्पणी पोस्ट करा