ब्युरो टीम: बीड जिल्ह्यात लवकरच रेल्वे सुरु होणार असून मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी बीड ते अहिल्यानगर रेल्वे गाडी सुरू करण्यात येणार आहे. परंतू बीड ते परळी वैजनाथ या रेल्वे मार्गातील भूसंपादनाबाबतचे अडथळे सर्व संबंधीत विभागानी दूर करून, भूसंपादन कामाची प्रक्रिया वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत उपविभागीय अधिकारी कविता जाधव, सहा.कार्यकारी अभियंता मुकुंद पुं. नाईक, वरिष्ठ अभियंता सुरेश कुमार मंडल तसेच संबंधित विभागाचे अधिकारी आदी उपस्थित होते. तसेच दूरदृश्य प्रणालीद्वारे उपविभागीय अधिकारी श्री. अरविंद लाटकर, श्रीमती वसीमा शेख, श्री. गौरव इंगोले यांनी बैठकीत सहभाग घेतला.
जिल्हाधिकारी जॉन्सन म्हणाले की, बीड ते परळी वैजनाथ रेल्वेमार्गाच्या भूसंपादनाचे प्रलंबित प्रकरणे सर्व संबंधीत विभागाने समन्वय साधून तातडीने निकाली काढून रेल्वे मार्गासाठी आवश्यक जमीन उपलब्ध करून देण्याची कार्यवाही करावी. राष्ट्रीय राज्यमार्ग विभागाने ब्रम्हवाडी येथील उड्डानपूलाचे काम लवकरात लवकर सुरु करावे. तसेच सर्व संबंधीत उपविभागीय अधिकारी यांनी भूसंपादना बाबतची प्रक्रिया वेळेत पूर्ण करुन अहवाल सादर करावा, असे निर्देश दिले.
जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी केली बीड रेल्वे स्थानकाची पाहणी
जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी आज बीड येथील रेल्वे स्थानकास प्रत्यक्ष भेट देवून पाहणी करत येथील कामांची माहिती घेतली. यावेळी जॉन्सन यांनी दि. 17 सप्टेंबर रोजी बीड ते परळी रेल्वेमार्गाच्या उद्घाटनाच्या अनुषंगाने संबंधित विभागांस योग्य नियोजन करण्याच्या सूचना दिल्या. तसेच रेल्वे स्थानकातील सर्व सुविधाची पाहणी करून आवश्यक त्या सूचना दिल्या. यावेळी श्री जॉन्सन यांच्या हस्ते परिसरात वृक्षारोपणही करण्यात आले.
यावेळी उपविभागीय अधिकारी कविता जाधव, तहसीलदार चंद्रकांत शेळके, उपमुख्य अभियंता डी.डी. लोळगे, कार्यकारी अभियंता मध्य रेल्वे अहमदनगरचे लोकेंद्र कुमार सिंग, वरिष्ठ अभियंता एल.पी. नायक, वरिष्ठ अभियंता अमरकुमार अकेला, वरिष्ठ अभियंता सुरेश कुमार मंडल यांची उपस्थिती होती.
टिप्पणी पोस्ट करा