PCMC : पिंपरीत आज झाला स्वच्छतेचा जागर, आयुक्त शेखर सिंह म्हणाले...

ब्युरो टीम : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या “स्वच्छता ही सेवा” अभियानांतर्गत पिंपरीत आज भव्य स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. पिंपरी मंडई परिसरात झालेल्या या मोहिमेत महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह सहभागी झाले होते. या स्वच्छता मोहिमेत  ७६२ किलो कचरा संकलीत करण्यात आला.

या मोहिमेत तब्बल ३५० हून अधिक नागरिकांनी स्वच्छतेची शपथ घेत उत्साहाने सहभाग नोंदविला. नागरिकांशी संवाद साधताना आयुक्त शेखर सिंह यांनी “स्वच्छ सर्वेक्षण २०२४-२५ मध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने देशात सातवे तर महाराष्ट्रात पहिले स्थान मिळवले आहे. आगामी सर्वेक्षणात देशात अव्वल क्रमांक पटकावण्यासाठी आपण सर्वांनी मिळून  सामूहिक प्रयत्न करणे आवश्यक आहे, यासाठी महानगरपालिका पूर्णपणे कटिबद्ध आहे.”असे सांगितले 

स्वच्छतेच्या मोहिमेदरम्यान आयुक्त शेखर सिंह यांनी सफाई सेवक महिला, व्यापारी आणि नागरिकांशी देखील संवाद साधला. सफाई सेवकांमुळे पिंपरी चिंचवड शहर स्वच्छ राहत असून,सफाई सेवकांचे योगदान बहुमोल आहे.

यावेळी बोलताना आरोग्य विभाग प्रमुख उप आयुक्त सचिन पवार म्हणाले शहर स्वच्छतेची आपली सामूहिक जबाबदारी असून, स्वच्छता सेवकांच्या मेहनतीला समाजाने योग्य आदर दिला पाहिजे,नागरिकांनीही स्वच्छतेच्या मोहिमेत सक्रिय सहभाग घेतला पाहिजे असेही ते म्हणाले.

दरम्यान, या मोहीमेची सुरुवात शगुन चौकातून झाली. त्यानंतर डिलक्स चौक, पिंपरी कॅम्प, रेल्वे स्टेशन आणि साई चौक या भागात स्वच्छता उपक्रम पार पडला. प्रत्येक ठिकाणी नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोहिमेला चालना दिली. यावेळी प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर न करण्याबाबत जनजागृती करण्यात आली तसेच आरोग्य विभाग आणि ओंजळ संस्थेच्या सहकार्याने व्यापाऱ्यांना पर्यावरणपूरक कापडी पिशव्यांचे वाटपही करण्यात आले.  

कार्यक्रमाला पिंपरी चिंचवड महानगरपालिका आरोग्य विभाग प्रमुख, उप आयुक्त सचिन पवार, अ क्षेत्रीय अधिकारी निवेदिता घार्गे, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, सहाय्यक आरोग्य अधिकारी राजू साबळे, कुंडलिक दरवडे, मुख्य आरोग्य निरीक्षक दत्तात्रय गणगे, आरोग्य निरीक्षक विकास शिंदे, स्नेहा चांदणे, कुणाल सगर, लक्ष्मण साळवे, धनेश्वर थोरवे, गणेश राजगे, गोपाळ धस, स्वच्छतादूत पवन शर्मा, पिंपरी मंडईचे अध्यक्ष भरत जगताप, संतोष वडमारे, गौतम रोकडे महापालिका अधिकारी कर्मचारी आदी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपआयुक्त सचिन पवार यांनी केले तर सूत्रसंचालन प्रफुल्ल पुराणिक यांनी केले.

स्वच्छतेची सामूहिक शपथ

"आम्ही अशी शपथ घेतो की, आम्ही स्वतः स्वच्छतेच्या प्रति जागरूक राहू आणि त्यासाठी वेळही देऊ. दरवर्षी १०० तास म्हणजे प्रत्येक आठवड्यातून दोन तास श्रमदान करून स्वच्छतेच्या या संकल्पाला पूर्ण करू. आम्ही स्वतः घाण करणार नाही, आणि दुसऱ्यालाही घाण करू देणार नाही. सर्वप्रथम आम्ही स्वतःपासून, आमच्या कुटुंबापासून, आमच्या गल्ली/वस्तीपासून आमच्या गावापासून तसेच आमच्या कार्यस्थळापासून या कामास सुरुवात करू. आम्हाला हे मान्य आहे की, जगामधील जे देश स्वच्छ आहेत, त्याचे कारण त्या ठिकाणचे नागरिक स्वतः घाण करीत नाहीत व घाण करूनही देत नाहीत. या विचारांनी आम्ही गावोगावी आणि गल्लोगल्ली स्वच्छ भारत मिशनचा प्रचार करू. आम्ही आज शपथ घेत आहोत, ती आणखी १०० लोकांकडूनही करवून घेऊ. ते पण आमच्यासारखे स्वच्छतेसाठी १०० तास देतील यासाठी आम्ही प्रयत्न करू. आम्हाला माहिती आहे की, स्वच्छतेच्या दिशेने टाकलेले आमचे एक पाऊल संपूर्ण भारत देशाला स्वच्छ करण्यासाठी मदत करील"... अशी शपथ यावेळी स्वच्छता मोहिमेत सहभागी झालेल्यांना देण्यात आली. जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांनी उपस्थितांना ही शपथ दिली.

पहा व्हिडिओ

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने