Kolhapur :नियोजनबद्ध शेतीतून उत्पादकता वाढ शक्य – पालकमंत्री प्रकाश आबिटकर 


ब्युरो टीम : नियोजनबद्ध शेती आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकरी आपली उत्पादकता वाढवू शकतात, असे ठाम मत सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तसेच कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी व्यक्त केले. नरतवडे येथील जय भवानी हॉल येथे कृषी समृद्धी योजनेचा जिल्हास्तरीय शुभारंभ आणि राष्ट्रीय खाद्यतेल अभियान (तेलबिया) अंतर्गत आयोजित प्रशिक्षण सत्रात ते शेतकऱ्यांशी संवाद साधत होते. या मेळाव्यात प्रगतशील शेतकरी, महिला बचत गट, शेतकरी उत्पादक कंपन्या, कृषी विज्ञान केंद्रातील शास्त्रज्ञ आणि कृषी विभागाचे अधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

पालकमंत्री आबिटकर यांनी शेतकऱ्यांना जमिनीचा आणि भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास करून, तज्ज्ञांचा सल्ला घेऊन पीक निवड करण्याचे आवाहन केले. केंद्र आणि राज्य शासन शेतकऱ्यांसाठी आधुनिक शेती तंत्रज्ञान, यांत्रिकीकरण, सिंचन आणि सेंद्रिय शेतीसाठी अनुदान देत आहे. तेलबिया अभियानातून सोयाबीन, शेंगदाणा, सूर्यफूल यांसारख्या पिकांचे उत्पादन वाढवून देशाला खाद्यतेलात स्वयंपूर्ण करण्याचा मानस आहे. या उद्देशाने आयोजित मेळाव्यात शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान आणि प्रक्रिया उद्योगातील संधींची माहिती देण्यात आली. प्रगतीशील शेतकऱ्यांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. तसेच योजनेची माहिती देणाऱ्या घडीपत्रिका व पुस्तिकेचे अनावरण करण्यात आले. 

आबिटकर यांनी जिल्ह्यातील अनुभवी शेतकऱ्यांचे मार्गदर्शन घेऊन शेतीला प्रगतीपथावर नेण्याचे आवाहन कृषी विभागाला केले. शेत पिकांचे नुकसान करणाऱ्या प्राण्यांपासून संरक्षणासाठी उपाययोजना कराव्यात आणि खरेदी-विक्री केंद्रांना चालना देऊन शेतकऱ्यांना खाजगी व्यापाऱ्यांपेक्षा जास्त दर मिळवून द्यावेत, असे त्यांनी सांगितले. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे पारदर्शकपणे करून एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही, याची खबरदारी घेण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. कृषी तंत्रज्ञान, यंत्रे आणि प्रक्रिया उद्योगाशी संबंधित पदार्थांचे स्टॉल्स मेळाव्याचे आकर्षण ठरले. कृषी समृद्धी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना आधुनिक शेतीच्या दिशेने वाटचाल करण्याची संधी मिळाली असून, तेलबिया अभियानामुळे देशाच्या खाद्यतेल स्वयंपूर्णतेचे स्वप्न साकार होईल, असा विश्वास या मेळाव्यातून व्यक्त झाला.

विभागीय कृषी सहसंचालक बसवराज मास्तोळी यांनी मेळाव्याचे प्रास्ताविक केले. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे, अरुण भिंगरदिवे उपस्थित होते. मेळाव्यात अविनाश सोळंके यांनी शेतीचे वन्य प्राण्यांपासून संरक्षण या विषयावर व्याख्यान दिले, तर भालचंद्र मुंढे यांनी फळप्रक्रिया व विक्री व्यवस्थापन याबाबत मार्गदर्शन केले. आयुर्वेदिक वनस्पती संशोधन आणि प्रक्रिया या विषयावर अरुण डोईफोडे यांनी उपयुक्त माहिती दिली. कृषी भूषण नाथराव कराड यांनी भविष्यातील शेतीचा वेध घेत शेतकऱ्यांना आधुनिक कृषी व्यवस्थेकडे वळण्याचे आवाहन केले. भुईमुगाच्या सुधारित जातींबाबत डॉ. सुनिल कराड यांनी शास्त्रीय माहिती दिली, तर जयवंत जगताप यांनी तेलबिया लागवड तंत्रज्ञानावर मार्गदर्शन केले.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने