Law College : लोकांना न्याय देण्यासाठी कायद्याचे शिक्षण महत्त्वाचे – अनिरुद्ध आडसूळ

ब्युरो टीम : “वकिलीचे शिक्षण केवळ न्यायव्यवस्थेपुरते मर्यादित नसून, समाज घडविण्याचेही साधन आहे. एलएलबी पदवी ही सर्वसमावेशक असून समाजाला न्याय देण्यासाठी कायद्याचे शिक्षण महत्त्वाचे आहे,” असे प्रतिपादन साकेश्वर ग्रामीण विकास सेवा संस्थेचे चेअरमन अनिरुद्ध आडसूळ यांनी केले. शारीरिक तंदुरुस्ती आणि मानसिक बळ या दोन्हींच्या जोपासनेतूनच सशक्त समाजाची निर्मिती होऊ शकते, असा संदेशही त्यांनी या प्रसंगी दिला.

साकेश्वर ग्रामीण विकास सेवा संस्थेच्या आडसूळ विधी महाविद्यालयात प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले. याप्रसंगी मार्गदर्शन करताना अनिरुद्ध आडसूळ बोलत होते. यावेळी साकेश्वर ग्रामीण विकास सेवा संस्थेच्या सचिव लीना आडसूळ, संस्थेचे संचालक कृष्णा आडसूळ, संस्थेच्या आडसूळ टेक्निकल कॅम्पसचे संचालक डॉ. प्रदीप पाटील, आर्ट्स, कॉमर्स अ‍ॅण्ड सायन्स कॉलेजचे प्राचार्य डॉ. संभाजी पठारे, विधी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रियाज बेग, पॉलिटेक्निकचे प्राचार्य रमेश गडाख, प्राचार्य डॉ. प्रदीप पंडित, प्राचार्य डॉ. संदेश वायाळ, प्राचार्य डॉ. धनंजय लांडगे, प्राचार्य डॉ.प्रवीण अरु, प्रा. श्रुती हलदार, प्रा. क्रांती बागूल, प्रा. प्रदीप गायकवाड आदी उपस्थित होते.

अनिरुद्ध आडसूळ पुढे म्हणाले, “कायद्याचे शिक्षण हे केवळ न्यायालयीन प्रक्रिया समजून घेण्यासाठी नाही, तर माणसांमधील हक्क, कर्तव्य आणि जबाबदाऱ्यांचे भान निर्माण करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. आजच्या काळात प्रत्येक नागरिकाने संविधान, कायदे आणि सामाजिक मूल्ये यांचा अभ्यास करून सजग नागरिक म्हणून आपली भूमिका पार पाडणे गरजेचे आहे. तंदुरुस्त शरीर आणि सजग मन या दोन्हींच्या एकत्रित प्रयत्नातूनच सक्षम आणि न्यायप्रिय समाज घडू शकतो. म्हणूनच युवकांनी वकिलीच्या माध्यमातून समाजसेवेचा मार्ग स्वीकारावा आणि लोकांपर्यंत न्याय पोहोचविण्याचे कार्य करावे.”

विधी महाविद्यालयाचे प्राचार्य रियाज बेग यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना आडसूळ विधी महाविद्यालयाच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप रोकडे यांनी केले. सपना छिंदम यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आडसूळ विधी महाविद्यालयाच्या द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने