जिल्हाधिकारी कार्यालयात विविध विभागांचा आढावा घेताना ते बोलत होते. या बैठकीस जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर, पोलिस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर, उपवनसंरक्षक मिलिश शर्मा, तसेच विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
खासदार राणे म्हणाले की, जिल्ह्यातील स्थानिक साधनसंपत्तीचा योग्य वापर करून रोजगारनिर्मिती आणि आर्थिक स्थैर्य साध्य करण्यासाठी प्रशासनाने सूक्ष्म नियोजन करावे. महसूल, कृषी, उद्योग, पंचायत, मत्स्य, पर्यटन आणि महिला व बालविकास विभागांनी जिल्ह्याच्या विकासासाठी नाविण्यपूर्ण उपक्रम राबवावेत, ज्याचा थेट फायदा नागरिकांना होईल.
ते पुढे म्हणाले की, गावागावांतील प्रमुख व्यवसाय, बाजारपेठेची मागणी, उपलब्ध संसाधने आणि कौशल्य विकासाच्या संधी यांचा सखोल अभ्यास करून तरुणांसाठी रोजगारनिर्मितीचा ठोस आराखडा तयार करावा. ग्रामीण भागातील उद्योग, शेतीपूरक व्यवसाय, पर्यटन, मत्स्यव्यवसाय आणि सूक्ष्म उद्योग यांचा संगम साधल्यास जिल्ह्यातील दरडोई उत्पन्नात लक्षणीय वाढ होऊ शकते.
शेती आणि शेतीपूरक उद्योगांना प्रोत्साहन
कृषी विभागाने शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी अन्नप्रक्रिया, मूल्यवर्धन, सेंद्रिय शेती, फळविकास आणि काजू प्रक्रिया उद्योगांना अधिकाधिक चालना द्यावी. पीक पद्धतीत योग्य बदल करून उत्पादन वाढविण्याचे नियोजन करावे. महिला बचतगटांना लघुउद्योगांशी जोडून ग्रामीण उद्योजकतेला नवी गती देण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले. या उपक्रमांमुळे ग्रामीण महिलांना आर्थिक स्वावलंबन मिळेल आणि जिल्ह्याच्या सर्वांगीण प्रगतीचा पाया अधिक मजबूत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

टिप्पणी पोस्ट करा