Adsule Law College : संविधान समजून घेणे ही प्रत्येक भारतीय नागरिकांची जबाबदारी — अनिरुद्ध आडसूळ

ब्युरो टीम : 'भारतीय लोकशाहीची मूलतत्त्वे जपण्यासाठी संविधान समजून घेणे ही प्रत्येक भारतीय नागरिकाची जबाबदारी आहे. संविधानातील प्रत्येक नियम व निकष हे देशातील सर्वांना समानपणे लागू आहेत आणि राष्ट्रातील प्रत्येक घटनेला संविधानाचा भक्कम आधार आहे. संविधानाने दिलेल्या मूल्यांचे पालन करून जीवन कार्यरत ठेवण्याचा संकल्प आजच्या दिवशी प्रत्येकाने केला पाहिजे,' असे प्रतिपादन साकेश्वर ग्रामीण विकास सेवा संस्थेचे चेअरमन अनिरुद्ध आडसूळ यांनी केले.

साकेश्वर ग्रामीण विकास सेवा संस्थेच्या आडसूळ विधी महाविद्यालयात भारतीय संविधान दिन (२६ नोव्हेंबर) उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी मार्गदर्शन करताना अनिरुद्ध आडसूळ बोलत होते.

यावेळी संस्थेच्या सचिव लीना आडसूळ, संस्थेचे संचालक कृष्णा आडसूळ, संस्थेच्या आडसूळ टेक्निकल कॅम्पसचे संचालक डॉ. प्रदीप पाटील आर्ट्स, कॉमर्स अ‍ॅण्ड सायन्स कॉलेजचे प्राचार्य डॉ. संभाजी पठारे, विधी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रियाज बेग, पॉलिटेक्निकचे प्राचार्य रमेश गडाख, प्राचार्य डॉ. प्रदीप पंडित, प्राचार्य डॉ. संदेश वायाळ, प्राचार्य डॉ. धनंजय लांडगे, प्राचार्य डॉ. प्रवीण अरू, प्रा. श्रुती हलदार, प्रा. क्रांती बागूल, प्रा. प्रदीप गायकवाड आदी उपस्थित होते.

याप्रसंगी डॉ. पठारे यांनी संविधान दिनानिमित्त भारतीय संविधान निर्मितीचा प्रवास, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधानाचे शिल्पकार म्हणून असलेले योगदान, तसेच नागरिकांना मिळालेले हक्क, स्वातंत्र्य आणि संविधानाचे सार्वत्रिक निकष याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.

डॉ. पठारे म्हणाले, भारतीय संविधान हे जगातील सर्वात प्रगत, सर्वसमावेशक आणि मानवतावादी संविधानांपैकी एक आहे. सामाजिक न्याय, समानता, बंधुता आणि स्वातंत्र्य या मूल्यांवर आधारित असलेले हे संविधान प्रत्येक नागरिकाला सन्मानाने जगण्याचा अधिकार देते. विद्यार्थ्यांनी संविधानातील मूलभूत अधिकारांसोबतच मूलभूत कर्तव्यांचीही तितक्याच प्रामाणिकपणे जाण ठेवावी, असा संदेश देखील त्यांनी दिला.

डॉ. प्रदीप पंडित यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना प्रत्येक भारतीय नागरिकांच्या जीवनात संविधानाचे असणारे महत्त्व विशद केले. प्रा. श्रुती हलदार आणि प्रा. क्रांती बागूल यांनी यावेळी आडसूळ विधी महाविद्यालयाच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. 

यावेळी २६/११ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यांतील शहिदांना श्रद्धांजली वाहण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप रोकडे यांनी केले. प्रा. अक्षय ठोंबे यांनी आभार मानले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आडसूळ विधी महाविद्यालयाच्या प्रथम व द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने