Delhi :मायेची ऊब हरवलेल्या चिमुकल्यांना दिल्लीच्या सहलीची अनोखी भेट !

ब्युरो टीम : नवी दिल्ली  येथील महाराष्ट्र सदनातील आजची संध्याकाळ एका वेगळ्याच आनंदाने पुलकीत झाली. सदनात रंगलेल्या छोटेखानी सांस्कृतिक कार्यक्रमाला मोठा भावनिक संदर्भ होता, तो अहिल्यानगर येथील संकल्प प्रतिष्ठानच्या  सावली या संस्थेतील 26 मुलांनी पाहिलेल्या एका अनोख्या स्वप्नाच्या पूर्ततेचा.  या संस्थेतील मायेची ऊब हरवलेल्या मुलांनी  दिल्लीच्या सहलीचे पाहिलेले स्वप्न सहद्य अधिकारी  आणि  इतर दात्यांनी केलेल्या मदतीमुळे प्रत्यक्षात साकारले ! 

अहिल्यानगर येथील  संकल्प प्रतिष्ठानची सावली ही स्वयंसेवी संस्था कार्यरत आहे. या संस्थेत आई-वडील नसलेली , विभक्त कुटुंबातील , ऊसतोडणी कामगारांची  तसेच एकलपालक असलेल्या मुलांचा सांभाळ केला जातो.   काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र शासनाच्या नवी दिल्लीतील निवासी आयुक्त तथा सचिव आर. विमला  यांनी  संस्थेला भेट दिली. या  भेटीदरम्यान त्यांनी मुलांशी हद्य संवाद साधला. श्रीमती विमला यांच्याजवळ मोकळेपणाने आपल्या भावना व्यक्त करतांना  मुलांनी देशाची राजधानी पाहण्याची  इच्छा व्यक्त केली.   मुलांची ही भावना श्रीमती  विमला यांना स्पर्शून गेली आणि त्यांनी ती पूर्ण करण्याचा मानस व्यक्त केला. 

“ही मुले त्यांच्या  वेदनांकित संदर्भामुळे माझ्या मनात घर करून होतीच. त्यात त्यांच्या दिल्ली सहलीची इच्छा ऐकताच मी  हलून गेले. त्यांना मी निश्चितच देशाची राजधानी अनुभवायला देईन,” असा निर्धार श्रीमती  विमला यांनी या बालगृहात दिलेल्या भेटीदरम्यान केला होता. या शब्दांतून व्यक्त झालेल्या संवेदना काही दिवसातच प्रत्यक्ष कृतीत साकारल्या  आणि त्यांच्याच पुढाकाराने संस्थेचे अध्यक्ष नितेश बनसोडे यांच्या नेतृत्वात गेल्या 3 नोव्हेंबरला ‘सावली’तील 26  मुले-मुली दिल्लीत दाखल झाली.  या मुलांमध्ये अगदी सहा सात वर्षाच्या बालकांपासून ते महाविद्यालयीन शिक्षण घेणा-या तरुण-तरुणींचाही समावेश होता. गेल्या चार दिवसात त्यांनी  दिल्लीतील विविध महत्वाच्या वास्तु आणि प्रेक्षणीय स्थळांना भेट दिली. आज सायंकाळी त्यांच्या या अनोख्या सहलीचा तितकाच अनोखा समारोप झाला. महाराष्ट्र सदनात या मुलांनी आपल्या उचंबळून आलेल्या आनंदाला मोकळी वाट करुन देताना विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.  या मुलांनी गाणी म्हटली, नृत्य केले आणि भावनेने भिजलेली मनोगतेही व्यक्त केली.  या सहलीच्या निमित्ताने नवीन अनुभूती प्राप्त झाल्याचा वेगळाच आनंद त्यांच्या चेह-यावर विलसत होता. त्यांचा हा हद्य अविष्कार पाहताना उपस्थित मान्यवर  भारावले. 

आपल्या मनोगतात सेजल जगताप या मुलीने  सांगितले की, दिल्ली दर्शन हे माझे स्वप्न होते… आज ते पूर्ण झाले. आम्ही पालकांविना आहोत, पण या देशाचे आहोत… आम्हाला मोठे होण्याचा पूर्ण हक्क आहे.” तर दुर्गा राजपूत  या मुलीने सांगितले की, हे चार दिवस मिळालेला मायेचा स्पर्श मी आयुष्यभर जपेन. आता मला ठाउक आहे… मी काहीही करू शकते!  

या कार्यक्रमात  श्रीमती विमला यांनी सर्व मुलांशी अत्यंत आस्थेने संवाद साधला आणि त्यांच्या भाव भावना जाणून घेतल्या. यावेळी त्यांच्यासह महाराष्ट्र परिचय केंद्राचे संचालक हेमराज बागुल, सहायक निवासी आयुक्त नितीन शेंडे, स्मिता शेलार, व्यवस्थापक प्रमोद कोलपते, संस्थेचे अध्यक्ष नितेश बनसोडे यांच्यासह महाराष्ट्र सदनातील सर्व अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने