ब्युरो टीम : पिंपरी चिंचवड शहरातील वाढती लोकसंख्या व वाढती वाहनसंख्या विचारात घेऊन भविष्यात शहरामध्ये वाहतूक कोंडीसारख्या समस्या निर्माण होऊ नयेत, यासाठी आगामी १५ वर्षांचा विचार करून महापालिकेने नियोजन आराखडा तयार करावा, असे निर्देश राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या विविध विभागांची आढावा बैठक आज महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीतील माजी महापौर मधूकर पवळे सभागृहात मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी ते बोलत होते.
या बैठकीस आमदार महेश लांडगे, शंकर जगताप, उमा खापरे, माजी आमदार अश्विनी जगताप,माजी महापौर राहूल जाधव,नितीन काळजे,माजी नगरसदस्य नामदेव ढाके, शत्रुघ्न काटे, विकास डोळस, ॲड.मोरेश्वर शेडगे, निगडी नवनगर विकास प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, विजयकुमार खोराटे, तृप्ती सांडभोर, सह आयुक्त मनोज लोणकर, मुख्य वित्त व लेखा अधिकारी प्रविण जैन, शहर अभियंता मकरंद निकम, नगर रचना व विकास विभागाचे उपसंचालक किशोर गोखले, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे, सहशहर अभियंते मनोज शेठीया, अनिल भालसाखळे, सहा आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अभयचंद्र दादेवार, स्मार्ट सिटीचे सहमुख्य कार्यकारी अधिकारी किरणराज यादव, मुख्य उद्यान अधिक्षक महेश गारगोटे, उपायुक्त अण्णा बोदडे, डॉ. प्रदीप ठेंगल, पंकज पाटील, ममता शिंदे, राजेश आगळे, संदीप खोत, सिताराम बहुरे, सहाय्यक आयुक्त किरणकुमार मोरे, उमेश ढाकणे, अतुल पाटील, अमित पंडित, अजिंक्य येळे, क्षेत्रीय अधिकारी तानाजी नरळे, किशोर ननावरे, निवेदिता घार्गे, पूजा दूधनाळे, अश्विनी गायकवाड, राजाराम सरगर, मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांच्यासह महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने शहरातील घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प, वाहतूक व्यवस्था, नदी पुनरुज्जीवन प्रकल्प, आरोग्य व्यवस्था, वैद्यकीय व्यवस्था आदी सोयीसुविधांबाबत करण्यात येत असलेल्या कामाचा आढावा बैठकीमध्ये मंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतला.
चंद्रकांत पाटील म्हणाले, शहरातील कचरा, सांडपाणी, वाहतूक असे प्रश्न सोडवण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या उपाययोजनांना गती देण्यात यावी. रस्त्यांवरील खड्ड्यांच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात यावे. सांडपाण्यावर प्रक्रिया करून पाण्याचा पुनर्वापर करण्यावर भर द्यावा. फुटपाथ अतिक्रमणमुक्त राहतील, यासाठी सुयोग्य नियोजन करावे, अशा सूचनाही मंत्री पाटील यांनी दिल्या. पिंपरी चिंचवड शहरामध्ये वाढणारी वाहनसंख्या लक्षात घेऊन वाहतूक कोंडीसारख्या समस्या निर्माण होऊ लागल्या आहेत. भविष्यात ही समस्या गंभीर होऊ नये, यासाठी पुढील १५ ते २० वर्षांचा विचार करून वाहतूक नियोजन आराखडा तयार करण्याची आवश्यकता आहे. तसेच तात्काळ उपाययोजनांसाठी पोलीस विभागाशी समन्वय साधून सिग्नल दुरुस्तींसह वाहतूक नियोजनासाठी इतर उपाययोजना करण्यास प्राधान्य द्यावे, असेही चंद्रकांत पाटील म्हणाले.

टिप्पणी पोस्ट करा