ब्युरो टीम : पुणे जिल्ह्यातील मानव-बिबट संघर्ष दिवसेंदिवस तीव्र होत असून, या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात सविस्तर बैठक घेण्यात आली.
या बैठकीस उपवनसंरक्षक प्रशांत खाडे (जुन्नर विभाग) व महादेव मोहिते (पुणे विभाग), प्रादेशिक व वन्यजीव विभागाचे सहाय्यक वनसंरक्षक, वनपरिक्षेत्र अधिकारी तसेच अन्य संबंधित अधिकारी उपस्थित होते.
बैठकीदरम्यान जिल्ह्यातील बिबट प्रवण क्षेत्रातील घटनांचा आढावा घेण्यात आला.शिरूर व आंबेगाव तालुक्यात १२ ऑक्टोबर २०२५ पासून आजअखेर एकूण १७ बिबट पकडण्यात आले असून, हे सर्व बिबट जुन्नर येथील ‘माणिकडोह बिबट निवारण केंद्रात’ ठेवण्यात आले आहेत. बिबट हल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरावर नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला असून तो २४x७ कार्यरत आहे. या नियंत्रण कक्षाचा टोल-फ्री क्रमांक १८०० ३०३३असा आहे.
अतिसंवेदनशील गांवामध्ये एआय प्रणाली, सोलार नाईट सर्व्हिलन्स ड्रोन, कॅमेरा ट्रॅप्स, सांऊड अलर्ट सिस्टीम ही यंत्रणा कार्यान्वयीत करण्यात आलेली आहे. सद्यस्थितीत जुन्नर वनविभागाकडे २६२ पिंजरे उपलब्ध आहेत व उर्वरित पिंजरे तयार करण्याचे काम सुरु आहे. तसेच इतर आवश्यक साहित्य खरेदीची कार्यवाहीही सुरु आहे.
जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी सूचित केले की, बाहेरील जिल्हे अथवा राज्यांमधून अल्पावधीत ७०० पिंजरे उपलब्ध करून देऊ शकणाऱ्या पुरवठादार, एजन्सी किंवा कंपन्यांकडून खरेदी करण्यात यावी. तसेच संभाव्य बिबट प्रवण क्षेत्र घोषित केलेल्या गावांमध्ये आवश्यक त्या ठिकाणी तत्काळ पिंजरे उपलब्ध करून द्यावेत.
ग्रामस्तरावर ग्रामसभा घेऊन नागरिकांना चालू उपाययोजना, जिल्ह्यातील घटना व त्यावर केलेल्या कार्यवाहीबाबत सविस्तर माहिती द्यावी. याचबरोबर ग्रामस्तरावर सहनियंत्रण समिती गठित करून त्यामध्ये अनुभवी व्यक्ती, वन आपदा मित्र, स्वयंसेवी संस्था व स्वयंसेवकांचा समावेश करावा, असेही निर्देश त्यांनी दिले.
या समितीमार्फत ड्रोन सर्व्हे करून गावात आढळणाऱ्या बिबट्यांची संख्या नोंदविणे, गस्त वाढविणे व नागरिकांना जनजागृती करणे, तसेच बिबट हल्याच्या अनुषंगाने आदर्श कार्यपद्धती (SOP) निश्चित करावी, असेही आदेश देण्यात आले. याशिवाय पोलिस अधीक्षक यांच्या स्तरावर ‘टायगर सेल’ ची बैठक घेऊन समन्वय वाढविण्याचे निर्देश देण्यात आले.
सद्यस्थितीत माणिकडोह बिबट निवारण केंद्रात ५० बिबट ठेवण्याची क्षमता असून, सध्या ६७ बिबट तिथे आहेत. जिल्ह्यात बिबट संख्येत वाढ होत असल्याने, जुन्नर वनविभागात १००० बिबट आणि पुणे वनविभागात ५०० बिबट सामावतील अशा विविध ठिकाणी नवीन बिबट निवारा केंद्रे उभारण्यासाठी कार्यवाही करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी संबंधित विभागांना दिले.

टिप्पणी पोस्ट करा