PCMC Election :मेट्रो स्थानक येथे मतदान जनजागृतीसाठी पथनाट्य व फ्लॅश मॉब


ब्युरो टीम : पिंपरी चिंचवड महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांमध्ये मतदानाबाबत जागृती निर्माण करण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिका मेट्रो स्थानक येथे प्रवाशांसाठी मतदान जनजागृती पथनाट्य तसेच फ्लॅश मॉबचे आयोजन करण्यात आले होते. या माध्यमातून ‘मतदान हा प्रत्येक नागरिकाचा हक्क व कर्तव्य आहे, तसेच प्रत्येक मत लोकशाही बळकट करण्यासाठी अमूल्य आहे’ असा संदेश देत नागरिकांना मतदानासाठी प्रोत्साहित करण्यात आले.

पिंपरी चिंचवड महापालिका सार्वत्रिक निवडणूक राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केली असून, या निवडणुकीसाठी १५ जानेवारी २०२६ रोजी प्रत्यक्ष मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर मतदारांमध्ये मतदानाबाबत जागृती निर्माण करण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेमार्फत महापालिका आयुक्त तथा निवडणूक अधिकारी श्रावण हर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली व अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांच्या अधिपत्याखाली महापालिका हद्दीत स्वीप कार्यक्रमांतर्गत व्यापक मतदान जनजागृती मोहीम सुरू आहे.

या मोहिमेचा एक भाग म्हणून पिंपरी चिंचवड महापालिका मेट्रो स्थानक येथे मतदान जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर, उपायुक्त अण्णा बोदडे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. मेट्रो स्टेशनवरील प्रवासी, नागरिक व युवकांनी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

मी मतदान करणार… चा केला निर्धार

मेट्रो स्थानकावर राबविण्यात आलेल्या मतदान जनजागृती अभियानांतर्गत स्वाक्षरी मोहीम तसेच ‘मी मतदान करणार…’ असा संदेश देणारा विशेष सेल्फी पॉईंट उभारण्यात आला होता. या ठिकाणी मतदान करण्याची प्रतिज्ञा म्हणून स्वाक्षरी करण्यासाठी तसेच जनजागृतीचा संदेश देणारे सेल्फी काढण्यासाठी मेट्रो प्रवाशांची लगबग दिसून आली. या उपक्रमात नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत मतदान करण्याचा निर्धार व्यक्त केला.

लोकशाही अधिक सक्षम करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने मतदानाचा हक्क बजावणे अत्यंत आवश्यक आहे. स्वीप उपक्रमांतर्गत राबविण्यात येणाऱ्या अशा नाविन्यपूर्ण जनजागृती उपक्रमांमुळे विशेषतः युवक व पहिल्यांदाच मतदान करणारे मतदार मोठ्या प्रमाणात मतदान प्रक्रियेत सहभागी होतील, असा विश्वास आहे.

- तृप्ती सांडभोर, अतिरिक्त आयुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका

मतदान जनजागृती ही केवळ एक मोहीम नसून ती लोकशाही संस्कृती रुजविण्याची प्रक्रिया आहे. सार्वजनिक ठिकाणी पथनाट्य, फ्लॅश मॉब, स्वाक्षरी मोहीम व सेल्फी पॉईंटसारख्या उपक्रमांमुळे नागरिकांपर्यंत मतदानाचा संदेश प्रभावीपणे पोहोचत असून, यामुळे मतदानाची टक्केवारी निश्चितच वाढेल.

-अण्णा बोदडे, उपायुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने