PCMC Election :लोकशाही सक्षमीकरणासाठी प्रत्येक निवडणुकीत मतदान करण्याचा नववर्षात संकल्प करा – आयुक्त श्रावण हर्डीकर


ब्युरो टीम: भारतीय संविधानाने नागरिकांना दिलेला मतदानाचा हक्क केवळ अधिकार नसून तो प्रत्येक जागरूक नागरिकाची जबाबदारी आहे. प्रत्येक निवडणुकीत मतदान केल्याने लोकशाही अधिक सक्षम होते. २०२६ हे नववर्ष आता सुरू होत आहे. या नववर्षात प्रत्येक निवडणुकीत नियमितपणे मतदान करण्याचा ठाम संकल्प करून याची सुरुवात येत्या १५ जानेवारी रोजी होणाऱ्या पिंपरी चिंचवड महापालिका सार्वत्रिक निवडणुकीतून करा, असे आवाहन आयुक्त तथा निवडणूक अधिकारी श्रावण हर्डीकर यांनी केले. नागरिकांचा सक्रिय सहभागच सक्षम, पारदर्शक आणि उत्तरदायी लोकशाही घडवू शकतो, असेही त्यांनी नमूद केले.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी राबविण्यात येत असलेल्या स्वीप कार्यक्रमांतर्गत मतदान जनजागृती उपक्रम शहरातील विविध भागांत राबवण्यात येत आहेत. या अंतर्गत आज महापालिकेच्या समाज विकास विभागाने आकुर्डी रेल्वे स्टेशन परिसरात उभारलेल्या ‘सखी आंगण’ येथे मतदान जनजागृती उपक्रम घेण्यात आला,त्यावेळी आयुक्त हर्डीकर बोलत होते.

महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर, उपायुक्त अण्णा बोदडे, उपायुक्त ममता शिंदे, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांच्यासह बचत गटांच्या सदस्य महिला यावेळी उपस्थित होत्या.

आयुक्त हर्डीकर म्हणाले, नवीन वर्षाचे आगमन आपल्या आयुष्यात नव्या आशा, संधी आणि सकारात्मक बदल घेऊन येत आहे. या पार्श्वभूमीवर ‘सखी आंगण’सारखा उपक्रम तुमच्या आयुष्याला निश्चितच कलाटणी देणारा ठरेल, असा मला ठाम विश्वास आहे. ही वास्तू केवळ एक प्रकल्प नसून तुमच्या सर्वांच्या आयुष्यात स्थैर्य, स्वावलंबन आणि भरभराट घडवून आणण्याचे माध्यम ठरेल. येत्या काळात येथे मिळणाऱ्या संधींचा पुरेपूर लाभ घेऊन प्रत्येकाने स्वतःचा आणि आपल्या कुटुंबाचा विकास साधावा. तसेच नवीन वर्षातच, १५ जानेवारी रोजी पिंपरी चिंचवड महापालिकेची निवडणूक होत आहे. या निवडणुकीत सर्व पात्र मतदारांनी आवर्जून मतदान करून लोकशाहीच्या या महत्त्वपूर्ण प्रक्रियेत सक्रिय सहभाग घ्यावा. आपल्या कुटुंबातील प्रत्येक मतदाराला,मित्रपरिवाराला देखील मतदानासाठी प्रोत्साहित करावे. कोणाच्याही दबावाखाली न येता, स्वेच्छेने आणि निर्भयपणे मतदान करणे हीच सक्षम आणि बळकट लोकशाहीची खरी ओळख आहे, असेही त्यांनी नमूद केले.

यावेळी मतदानाचे महत्त्व नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी मतदान जनजागृतीबाबत पथनाट्य सादरीकरण करण्यात आले. या पथनाट्याच्या माध्यमातून प्रत्येक नागरिकाने प्रत्येक निवडणुकीत मतदान करण्याचा संदेश देण्यात आला. माणिक खटींग, निलम वाघमारे, अनिकेत शिंदे, शिवप्रसाद पासलकर, भरत साळुंखे या कलाकारांनी या नाटकाचे सादरीकरण केले. तसेच फ्लॅश मॉबचे सादरीकरण करून मतदानाबाबत जनजागृती करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रफुल्ल पुराणिक यांनी केले.

आयुक्तांनी बचत गटांकडून खाद्यपदार्थांची केली खरेदी

आकुर्डी येथील सखी आंगण खाद्यपदार्थ केंद्रात एकूण ४९ गाळे कार्यरत असून, या ठिकाणी महिला बचत गटांमार्फत विविध खाद्यपदार्थांचा व्यवसाय केला जात आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी या सर्व गाळ्यांना भेट देत महिला बचत गटांकडून सुरू असलेल्या व्यवसायाची सविस्तर माहिती घेतली. यावेळी त्यांनी विविध खाद्यपदार्थांची खरेदी करून त्यांचा आस्वाद घेत महिलांच्या उपक्रमांचे कौतुक देखील केले.

मतदानाची शपथ

आम्ही, भारताचे नागरिक, लोकशाहीवर निष्ठा ठेवून याद्वारे प्रतिज्ञा करतो की, आपल्या देशाच्या लोकशाही परंपरांचे जतन करू आणि मुक्त, निःपक्षपाती व शांततापूर्ण वातावरणातील निवडणुकांचे पावित्र्य राखू. तसेच प्रत्येक निवडणुकीत निर्भयपणे तसेच धर्म, वंश, जात, समाज, भाषा यांच्या विचारांच्या प्रभावाखाली न येता किंवा कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता मतदान करू, अशी मतदानाची शपथ यावेळी उपस्थितांना देण्यात आली. 

मतदान ही केवळ निवडणुकीतील एक प्रक्रिया नसून ती नागरिकांच्या जबाबदारीची जाणीव करून देणारी लोकशाही मूल्यांची अभिव्यक्ती आहे. महिलांनी आणि युवकांनी पुढाकार घेऊन मतदान केल्यास समाजातील सकारात्मक बदल अधिक वेगाने घडू शकतात. प्रत्येक मत हे लोकशाहीचा पाया मजबूत करणारे असते. म्हणूनच मतदानाबाबत जागरूकता निर्माण करून प्रत्येक पात्र नागरिकाला मतदान प्रक्रियेत सहभागी करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

- तृप्ती सांडभोर,  अतिरिक्त आयुक्त,  पिंपरी चिंचवड महापालिका

स्वीप कार्यक्रमाच्या माध्यमातून मतदानाबाबत व्यापक जनजागृती निर्माण करण्यासाठी महापालिका सातत्याने शहराच्या विविध भागात उपक्रम राबवत आहे. प्रत्येक मतदाराने मतदान केंद्रापर्यंत पोहोचावे, यासाठी प्रशासनाकडून आवश्यक त्या सर्व सुविधा आणि मार्गदर्शन उपलब्ध करून दिले जात असून जास्तीत जास्त नागरिकांनी येत्या १५ जानेवारीला मतदान करावे. 

- अण्णा बोदडे, उपायुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका

सखी आंगणसारखे उपक्रम महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासोबतच सामाजिक जाणीव आणि आत्मविश्वास वाढवण्याचे महत्त्वाचे माध्यम ठरतात. आर्थिक स्वावलंबनासोबत लोकशाही प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेतला, तर समाज अधिक सक्षम आणि समतोल बनेल. त्यामुळे सखी आंगण येथे घेतलेला मतदान जनजागृती उपक्रमाचे विशेष महत्त्व आहे. 

-ममता शिंदे,  उपायुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका

पहा व्हिडिओ 



0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने