Dr. Sujay Vikhe Patil : रात्री उशिरा डॉ. सुजय विखे रस्त्यावर, कारण...



ब्युरो टीम :राहुरी शहरातून जाणाऱ्या नगर–मनमाड महामार्गावरील रस्त्याच्या कामामुळे गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाहतूक कोंडी होत असून प्रवासी, वाहनचालक व स्थानिक नागरिक मोठ्या त्रासाला सामोरे जात होते. या गंभीर परिस्थितीची दखल घेत माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी प्रशासन व संबंधित ठेकेदाराला तातडीच्या उपाययोजना करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या. त्यांच्या हस्तक्षेपानंतर काही प्रमाणात वाहतूक व्यवस्था सुरळीत झाल्याचे सोमवारी दिसून आले.

या पार्श्वभूमीवर सोमवारी रात्री सुमारे १०.३० वाजण्याच्या सुमारास डॉ. सुजय विखे पाटील यांनी राहुरीत प्रत्यक्ष उपस्थित राहून नगर–मनमाड मार्गावरील वाहतूक व्यवस्थेचा सखोल आढावा घेतला. यावेळी त्यांनी रस्त्यावर थांबून नागरिकांशी संवाद साधत परिस्थितीची माहिती घेतली तसेच संबंधित यंत्रणांना आवश्यक सूचना दिल्या.

मागील काही दिवसांपासून वाहतूक कोंडीमुळे राहुरीकरांना सहन करावा लागलेल्या त्रासाबद्दल त्यांनी मनापासून दिलगिरी व्यक्त करत, “जनतेचा विश्वास हीच माझी खरी ताकद आहे. केवळ फोटो-व्हिडिओपुरते काम न करता प्रत्यक्ष प्रश्न सुटले पाहिजेत, हीच माझी भूमिका आहे,” असे ठामपणे सांगितले.

यावेळी देवळाली प्रवरा येथील नगरसेवक ऋषभ लोढा, अक्षय तनपुरे, मनोज गव्हाणे, महेश गायकवाड यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी डॉ.सुजय विखे म्हणाले,  'मी सगळ्यांना विश्वासात घेऊन काम करणारा माणूस आहे. निष्ठावान व शिस्तबद्ध कार्यकर्त्यांची साथ मला लाभली, हे माझं भाग्य आहे. आमचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरून आंदोलन करत नाहीत, तर नेत्याने दिलेल्या आदेशांचे काटेकोर पालन करतात. आज त्यांनी वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी प्रत्यक्ष मदत केली. जिथे ट्रॅफिक जाम आढळेल, तिथे आमचे कार्यकर्ते स्वतः पुढाकार घेऊन नियोजन करतील. फक्त एकदा येऊन फोटो काढून लोकांना न्याय मिळाला नाही, तर लोकांचा विश्वास संपतो याची मला पूर्ण जाणीव आहे. आज केवळ एका तासाचा अपवाद वगळता कुठेही वाहतूक ठप्प नव्हती. मागील काही दिवसांत झालेल्या त्रासाबद्दल मी राहुरीकरांची मनापासून माफी मागतो.

पहा व्हिडीओ


0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने