ब्युरो टीम : अमरावती येथे कार्यरत देशातील पहिल्या मराठी भाषा विद्यापीठाच्या प्रथम सत्राच्या पहिल्या परीक्षेस सोमवार, दि. 19 जानेवारीपासून सुरूवात झाली आहेत. विद्यापीठाच्या स्थापनेनंतरच्या या पहिल्याच परीक्षा असल्याने विद्यार्थी आणि व्यवस्थापनामध्ये आनंदाचे वातावरण आहे.
पहिलेच वर्ष असल्याने विद्यापीठाने चार अभ्यासक्रम सुरू केले आहेत. यात कला स्नातक (बी.ए.) भाषा व लिपीशास्त्र, प्रादर्शिक कला स्नातक (बी.पी.ए. नाटक), स्नातकोत्तर मराठी (अभिजात भाषा) आणि स्नातकोत्तर मानसशास्त्र या अभ्यासक्रमांचा समावेश आहे. विद्यापिठाचे पहिलेच वर्ष असतानाही 49 विद्यार्थ्यांनी या अभ्यासक्रमात प्रवेश घेतला. अभ्यागत प्राध्यापकांच्या सहकार्याने प्रथम सत्राचे वर्ग सुरू करण्यात आले. कालपासून या सर्व चार अभ्यासक्रमांच्या पहिल्या सत्राची परीक्षा सुरळीतपणे सुरू झाली आहे. याचा विद्यापीठातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आनंद व्यक्त केला. विद्यापीठाचा प्रारंभ असल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांच्या मनात धाकधूक होती, परंतु विद्यापीठ व्यवस्थापनाने तज्ज्ञ अभ्यागत प्राध्यापकांना निमंत्रित करून त्यांच्याकडून अभ्यासक्रम पूर्ण करून घेतला. त्यामुळे विद्यापीठातील विद्यार्थीवर्ग सुखावला असून विद्यापीठाबद्दलचा आत्मविश्वास वाढला आहे.
अनेक अडचणी असतानाही विद्यापीठाला एक वर्ष पूर्ण व्हायच्या आतच या चार अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया राबविली. विद्यार्थ्यांनी उत्तम प्रवेशास प्रतिसाद दिला. अभ्यासकांनी विद्यापीठाच्या अभ्यासक्रमांची मांडणी केली असल्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या भविष्यकाळात या अभ्यासक्रमांचा निश्चितच उपयोग होणार आहे, अशी भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. पुढील वर्षी नवे अभ्यासक्रम विद्यापीठ सुरू करणार असल्याचे विद्यापीठाच्या कला व साहित्य प्रशालेचे अधिष्ठाता व प्रभारी परीक्षा नियंत्रक डॉ. कोमल ठाकरे यांनी सांगितले.
.jpeg)
टिप्पणी पोस्ट करा