ब्युरो टीम : भारतीय संविधानाने प्रत्येक नागरिकाला सन्मानाने जगण्याचा अधिकार दिला आहे. प्रशासकीय कामकाज पारदर्शक, वेगवान व लोकाभिमुख करणे हेच संविधानातील तत्त्वांचे खरे पालन आहे. या अनुषंगाने प्रशासनाची वाटचाल वेगाने 'ई-प्रशासन' कडे सुरू असून, नागरिकांना शासकीय सेवा त्यांच्या दारी उपलब्ध करून देण्यावर भर दिला जात आहे. जनतेचा त्रास कमी करून लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन शिर्डीचे अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर यांनी केले.
भारताच्या ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त राहाता तहसील कार्यालय येथे अपर जिल्हाधिकारी श्री. कोळेकर यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळा उत्साहात संपन्न झाला, त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी शिर्डीचे उपविभागीय अधिकारी माणिक आहेर, पोलीस उपअधीक्षक अमोल भारती, तहसीलदार अमोल मोरे, गटविकास अधिकारी विवेक गुंड, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपकार्यकारी अभियंता काशिनाथ गुंजाळ, माहिती अधिकारी सुरेश पाटील, तालुका कृषी अधिकारी आबासाहेब भोरे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
कोळेकर म्हणाले, लोकशाहीत विकासाचे फायदे तळागाळातील घटकांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी शासनाने 'मुख्यमंत्री बळीराजा पांदण रस्ते योजने'ला प्राधान्य दिले आहे. शेतातील रस्ते बारमाही व मजबूत करून शेतकऱ्यांच्या शेतमालाला हक्काची बाजारपेठ मिळवून देणे, हे प्रशासनाचे प्रमुख उद्दिष्ट आहे.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केलेल्या संविधानात न्याय व समता ही लोकशाहीची प्रमुख मूल्ये आहेत. युवकांनी व्यसनमुक्त होऊन राष्ट्रउभारणीत योगदान द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले.
यावेळी पोलीस दल व विद्यार्थी पथकाच्या शिस्तबद्ध संचलनाद्वारे राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली. सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांनी केवळ मनोरंजन नव्हे, तर सामाजिक प्रबोधनावर भर दिला. विशेषतः जि.प. प्राथमिक शाळा धनगरवाडीच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेली 'संविधानाचा गोंधळ' ही नाटिका उपस्थितांचे लक्ष वेधून घेणारी ठरली. तसेच शारदा कन्या विद्यालय, जि.प. शाळा गोदावरी वसाहत, जि.प. शाळा केलवड व साध्वी प्रीतीसुधाजी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते आणि नृत्याविष्कार सादर केले.
लोकशाही प्रक्रियेचा कणा मानल्या जाणाऱ्या व विधानसभा निवडणुकीत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांचा यावेळी विशेष सन्मान करण्यात आला. यामध्ये मोहसीन शेख, नंदकुमार बनसोडे, आकाश वाघमारे, संजय तांबे, रेखा गायकवाड व पर्यवेक्षक सोमनाथ येलमामे यांचा समावेश होता. तसेच कृषी क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणाऱ्या कृषी सखी व अधिकाऱ्यांचाही (मनिषा गोडगे, संदीप निर्मळ, मिना जाधव, विनायक भाकरे, राजदत्त थोरे) गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नायब तहसीलदार हेमंत पाटील यांनी केले. याप्रसंगी नायब तहसीलदार सुधाकर ओहोळ, बाळासाहेब मुळे तसेच विविध विभागांचे अधिकारी, पत्रकार, स्वातंत्र्यसैनिक, ज्येष्ठ नागरिक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा