Nashik :सिंहस्थ कुंभमेळ्याची कामे गुणवत्ता राखून वेळेत पूर्ण करा - आयुक्त शेखर सिंह


ब्युरो टीम : आगामी नाशिक–त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा हा जागतिक स्तरावरील अत्यंत महत्त्वाचा धार्मिक सोहळा असून अमृतस्नान दिनी सुमारे एक कोटी भाविक येण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर शहर व परिसरात विविध विभागांमार्फत सुरू असलेली पायाभूत सुविधांची कामे गुणवत्तापूर्ण पद्धतीने आणि निर्धारित वेळेत पूर्ण करावीत, असे निर्देश कुंभमेळा विकास प्राधिकरण आयुक्त शेखर सिंह यांनी दिले.

आयुक्त सिंह यांनी आज त्र्यंबकेश्वर येथे प्रयाग तीर्थ, सांडपाणी प्रक्रिया केंद्र, जैव वैद्यकीय कचरा व्यवस्थापन प्रकल्प, मुकुंद तलाव, जलशुद्धीकरण केंद्र बिलवेश्वर तलाव, घनकचरा व्यवस्थापन आदी विविध विकास कामांच्या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. यानंतर त्र्यंबकेश्वर नगरपरिषद येथे आयोजित बैठकीत ते बोलत होते.

यावेळी पर्यटन विभागाचे उपसंचालक डॉ. नंदकुमार राऊत, त्र्यंबक नगर परिषदेच्या नगराध्यक्षा त्रिवेणी तुंगार, उपनगराध्यक्षा मंजूताई वारुणसे, सिंहस्थ कुंभमेळा विकास प्राधिकरणाचे मुख्याधिकारी अमोल चौधरी, महाराष्ट्र राज्य पुरातत्व विभागाचे सहाय्यक संचालक अमोल गोटे, त्र्यंबक नगर परिषदेचे मुख्याधिकारी राहुल पाटील, कार्यकारी अभियंता मनोज ढोकचौळे, सुमित गांगुर्डे, शहर अभियंता स्वप्निल काकड, वास्तु विशारद अदिती गोखले यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

आयुक्त सिंह म्हणाले की, कुंभमेळ्याचा मुख्य कालावधी 15 जून ते 30 सप्टेंबर 2027 असा असून सर्व कामे या कालावधीपूर्वी पूर्ण करणे बंधनकारक आहे. केवळ कामे पूर्ण करणे हे उद्दिष्ट नसून ती उच्च दर्जाची असणे अत्यावश्यक आहे. ही कामे भाविकांच्या सुरक्षितता, सुविधा व सुव्यवस्थेसाठी अत्यंत महत्त्वाची आहेत.  प्रयाग तीर्थ, इंद्रकुंड, मुकुंदेश्वर तीर्थ, बिल्वतीर्थ येथील साठलेला गाळ काढणे, स्वच्छता व संवर्धनाची कामे सुरू करावीत. कुशावर्त कुंड येथील पहिल्या टप्प्यातील काम ध्वजारोहणापूर्वी पूर्ण होतील या दृष्टीने काटेकोर नियोजन करावे तसेच दुसऱ्या टप्प्यातील महत्त्वाच्या कामांची निविदा प्रक्रिया पूर्ण करावी. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत दर्शन पथ व डीपी रस्त्याच्या कामांना गती द्यावी. सांडपाणी प्रक्रिया केंद्राची कामे, घनकचरा प्रकल्पाच्या कंपाउंड भिंतीचे काम विहित मुदतीत पूर्ण करण्याच्या सूचना आयुक्त सिंह यांनी दिल्या. 

कुंभमेळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व विभागांनी परस्पर समन्वयाने कार्य करून नियोजित कामे वेळेत पूर्ण करावीत. यापुढे प्रत्येक मंगळवारी नियोजित प्रकल्पांना भेटी देऊन कामांचा आढावा घेण्यात येणार असल्याचे आयुक्त शेखर सिंह यांनी केले.

अशी आहेत प्रस्तावित कामे 

त्र्यंबक नगर परिषदेमार्फत सिमेंट काँक्रीट रस्ते, पर्जन्य जलवाहिन्या व विद्युत डक्ट्स (रु. 89.81 कोटी), पाणीपुरवठा योजना (रु. 64.21 कोटी) तसेच घनकचरा व्यवस्थापन (रु.11.03 कोटी) ही कामे प्रस्तावित आहेत. राज्य पुरातत्व विभागामार्फत कुशावर्त तीर्थ विकास, गौतमीतलाव तसेच विविध मंदिरांचे संवर्धन (एकूण रु. 36.92 कोटी) सुरू आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग, जलसंपदा विभागामार्फत उपसा जलसिंचन योजना (रु 328.80 कोटी) आणि MSIDC मार्फत दर्शन पथ व डीपी रस्ते (रु. 250 कोटी) यांसह अनेक महत्त्वपूर्ण प्रकल्प प्रगतीपथावर असल्याचेही सर्व संबंधित विभागाचे अधिकारी यांनी यावेळी बैठकीत सांगितले.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने