Maharashtra Kesari Video : नाशिकचा हर्षवर्धन सदगीर ठरला महाराष्ट्र केसरीचा मानकरी


विक्रम बनकर (ब्युरो टीम ) : स्वर्गीय अजित पवार क्रीडा नगरी, वाघोली (पुणे) येथे आयोजित ६८ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेतील अत्यंत चुरशीच्या अंतिम लढतीत नाशिकच्या हर्षवर्धन सदगीर याने सोलापूरच्या महेंद्र गायकवाड याला पराभूत करत विजेतेपद पटकावले आणि ६८ वा महाराष्ट्र केसरी किताब आपल्या नावे केला.

हर्षवर्धन यांना शिक्षण मंत्री दादाजी भुसे व कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते चांदीची गदा, रोख ५ लाख रुपये आणि फॉर्च्युनर कारची चावी प्रदान करण्यात आली. तर या स्पर्धेत सोलापूरच्या महेंद्र गायकवाड यांनी उपविजेतेपद पटकावले. त्यांना रोख ४ लाख रुपये तसेच स्कॉर्पिओ गाडीची चावी देऊन सन्मानित करण्यात आले.

कार्यक्रमाला आमदार बापूसाहेब पठारे, ज्ञानेश्वर कटके, राष्ट्रीय कुस्तीगीर महासंघाचे अध्यक्ष संजयकुमार, महाराष्ट्र कुस्तीगीर महासंघाचे अध्यक्ष रामदास तडस, संयोजक रामकृष्ण सातव पाटील यांच्यासह कुस्ती संघटनांचे पदाधिकारी व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले,  राज्यातील खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. विद्यार्थ्यांना लहानपणापासूनच क्रीडा क्षेत्रात संधी मिळावी, यासाठी प्रत्येक जिल्ह्यात क्रीडा स्पेशालिस्ट शाळा सुरू करण्यात येणार असल्याची त्यांनी माहिती दिली.

यावेळी कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी कुस्ती क्षेत्रासाठी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या योगदानाची आठवण करून दिली. भविष्यात कुस्तीपटूंना भेडसावणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी शासनाकडून सर्वतोपरी मदत करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चित्रफितीद्वारे स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या.  त्यांनी स्पर्धेतील मोठ्या सहभागाचे कौतुक करत महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या पारितोषिक रकमेत ४० लाखांवरून १ कोटी रुपयांपर्यंत वाढ करण्यात आल्याचे नमूद केले. राज्यातील कुस्तीपटूंनी आंतरराष्ट्रीय स्तरावर पदके जिंकण्याचा संकल्प करावा, असे आवाहन त्यांनी केले.

पहा : महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेतील अत्यंत चुरशीच्या अंतिम लढतीचा थरारक व्हिडिओ

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने