PCMC :ग्रीन सोसायटी उपक्रमाला पिंपरी चिंचवड महापालिकेची गती


ब्युरो टीम :  पिंपरी चिंचवड शहराला स्वच्छ, हरित आणि शाश्वत बनविण्याच्या दिशेने पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रभावीपणे काम करत असून, आरोग्य विभागाच्या माझी वसुंधरा ६.० अभियानांतर्गत राबविण्यात येणाऱ्या ‘ग्रीन सोसायटी’ हा उपक्रम शहरात सकारात्मक बदल घडवून आणत आहे. 

या उपक्रमामुळे गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये वसुंधरापूरक उपक्रमांची चळवळ निर्माण झाली असून, ‘ग’ क्षेत्रीय कार्यालय, प्रभाग क्रमांक २४ येथील रॉयल कॅसल सोसायटीने या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत आदर्श निर्माण केला आहे.

पिंपरी चिंचवड महापालिकेचे महापौर रवि लांडगे, उपमहापौर शर्मिला बाबर, आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, उप आयुक्त डॉ. प्रदीप ठेंगल तसेच उप आयुक्त किरणकुमार मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम शहरभर प्रभावीपणे राबविला जात आहे.

रॉयल कॅसल सोसायटीमध्ये वसुंधरा संवर्धनाला केंद्रस्थानी ठेवून विविध प्रकल्पांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. या उपक्रमांच्या यशस्वी अंमलबजावणीत सोसायटीचे अध्यक्ष संदिपकुमार शिंदे तसेच विकास जाधव, शरद रिंके, पल्लवी निंबाळकर आणि श्रीधर रसाळ यांचे विशेष योगदान आहे.

त्यामध्ये प्रामुख्याने कचरा व्यवस्थापन व कंपोस्टिंग प्रकल्पाद्वारे ओल्या कचऱ्याचे खतामध्ये रूपांतर केले जात आहे. रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्पामुळे पावसाच्या पाण्याचे संकलन करून त्याचा पुनर्वापर केला जातो. ग्रे वॉटर प्रकल्पामुळे वापरलेल्या पाण्याचा पुनर्वापर करून पाणी बचतीस हातभार लागतो.

याशिवाय, सौर ऊर्जा प्रकल्पाद्वारे स्वच्छ आणि पर्यावरणपूरक ऊर्जेचा वापर करण्यात येत आहे. अशा प्रकारचे सर्वसमावेशक पर्यावरणपूरक उपक्रम सातत्याने राबविणाऱ्या सोसायट्यांना पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून ‘५-स्टार सोसायटी’ म्हणून विशेष मानांकन दिले जाते. रॉयल कॅसल सोसायटीही या मानांकनाच्या दिशेने वेगाने वाटचाल करत असल्याचे दिसून येते.

महापालिकेकडून माझी वसुंधरा ६.० अभियानांतर्गत ‘ग्रीन सोसायटी’ उपक्रमांतर्गत पर्यावरणपूरक उपाययोजना करणाऱ्या सोसायट्यांना मालमत्ता करात सवलती दिल्या जात असून, एकापेक्षा अधिक प्रकल्प प्रभावीपणे राबविणाऱ्यांना १० ते १५ टक्क्यांपर्यंत करसवलतीचा लाभ मिळतो. त्यामुळे नागरिकांचा सहभाग वाढत असून, शहर हरित बनविण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलले जात आहे.

"ग" क्षेत्रीय अधिकारी किशोर ननवरे यांच्या अधिपत्याखाली आरोग्य निरीक्षक स्नेहल सुकटे, आरोग्य सहाय्यक प्रशांत गोठे, प्रदीप सोनवणे यांच्या प्रयत्नांतून हा उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात आला.

क्षेत्रीय अधिकारी किशोर ननवरे यांनी सोसायटीच्या उपक्रमांचे कौतुक करत, महापालिकेच्या मार्गदर्शनाखाली अशा उपक्रमांना अधिक चालना मिळत असल्याचे सांगितले. तसेच, नागरिकांचा वाढता सहभाग ही या उपक्रमाची मोठी जमेची बाजू असून, अशा पर्यावरणपूरक उपक्रमांमुळे शहराच्या शाश्वत विकासाला निश्चितच गती मिळेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

पिंपरी चिंचवड महापालिका शहराच्या पर्यावरण संवर्धनासाठी कटिबद्ध असून ग्रीन सोसायटी या उपक्रमातून नागरिकांचा सहभाग वाढविण्यावर भर दिला जात आहे. यामुळे स्वच्छ आणि शाश्वत शहर उभारणीस गती मिळत आहे. शहरातील इतर सोसायट्यांनीही या उपक्रमांपासून प्रेरणा घेऊन पर्यावरण संवर्धनासाठी पुढाकार घ्यावा.

-रवि लांडगे, महापौर, पिंपरी चिंचवड महानगरपालिका

कचरा व्यवस्थापन, पाणी पुनर्वापर आणि अक्षय ऊर्जेचा वापर या बाबींची अंमलबजावणी ही काळाची गरज आहे. महापालिकेच्या पुढाकारामुळे शहरात वसुंधरापूरक बदल घडत असून, भविष्यातील पिढ्यांसाठी हे उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरणार आहेत.

-डॉ. विजय सूर्यवंशी, आयुक्त,पिंपरी चिंचवड महानगरपालिका

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने